
सेलू :( प्रतिनिधी ) भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट स्टडीज, नवी मुंबई यांच्या वतीने दिनांक २६ व २७ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या यंग इंडिया पाककला स्पर्धेच्या विभागीय स्तरावर बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून शाळेचा गौरव वाढविला.
या स्पर्धेत शाळेतील विद्यार्थी अमेय भरडे व अथर्व शेळके यांनी सहभाग घेतला. पाककला क्षेत्रातील कौशल्ये विकसित करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अशा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांचे प्रदर्शन करण्याची संधी मिळते, तसेच त्यांच्यात आत्मविश्वास, नावीन्यपूर्ण विचार आणि व्यावहारिक कौशल्ये विकसित होतात.
या विद्यार्थ्यांना शाळेच्या प्राचार्या रितू श्रीवास्तव मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आणि कामगिरीचे संस्थेच्या अध्यक्षा भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेत विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रम राबविले जातात. यंग इंडिया पाककला स्पर्धेतील सहभागामुळे विद्यार्थ्यांना पाककला क्षेत्राचा अनुभव मिळाला असून, त्यांच्या कौशल्यविकासाला प्रोत्साहन मिळाले आहे.

