
जळगाव निंबायती (वार्ताहार) – खरंतर मुलांनी मनावर घेतले तर अगदीच बदल घडतो. त्यामुळे दिवाळीत वायूप्रदूषण व ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी ‘फटाके विरहित प्रदूषणमुक्त व पर्यावरण पुरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प’ येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुट्टी लागण्यापूर्वी करीत सामाजिक जबाबदारीचे भान जोपासायचा निर्णय घेतला. सदर प्रयत्न इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.
विद्यार्थ्यांना उर्जा देण्याचा स्रोत शिक्षक ठरतात. पर्यावरण विभागाचे उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे यांनी प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची सामुदायिक शपथ सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना दिली. यावेळी संस्थेचे सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, प्राचार्य व्ही. डी. काळे, पर्यवेक्षक डी. के. जगताप, विभाग प्रमुख एस. टी. जाधव, पी. यू. शिंदे, सी. डी. राजपूत, डी. एस. जमधाडे, ए. व्ही. अहिरे, योगेश ठोके, प्रशांत देवरे, सुदय बोरसे, दीपक बोरसे हर्षदा अहिरराव सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. महाविद्यालयातर्फे राबविण्यात आलेल्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाला विद्यार्थी व पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी दिवाळीत आई वडिलांकडे फटाक्यांचा आग्रह धरायचा नाही. फटाकेच विकत घ्यायचे नाहीत, फटाके फोडायचेच नाही, असा निर्धार घेतलेल्या शपथेतून केला. ‘निरोगी व प्रदूषणमुक्त वातावरणात तसेच जगण्यासाठी पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, निसर्ग संरक्षण होईल यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत’, अशा आशयाची फटाके न उडवण्याची शपथ प्रा. अहिरे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना दिली. फटाक्यातून जी रक्कम वाचणार आहे. त्यातून पुस्तके, दिवाळी अंक विकत घेणे, किल्ले तयार करणे, निरनिराळे छंद जोपासणे, शैक्षणिक सहल, पर्यटन करणे, अनाथाश्रमास भेट देण्याच्या पर्यायाला प्राधान्य देण्याचा संकल्प काही विद्याथ्यांनी यावेळी बोलून दाखवला.
चौकट –
यंदाच्या वर्षी कमी पावसामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. यामुळे पर्यावरण पुरक, प्रदुषण विरहित व फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याच्या अत्यंत स्तुत्य अशा सामाजिक उपक्रमाला साद घालत गत पाच वर्षांपासून विद्यालयातील बहुतांश विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केला आहे. फटाक्याच्या वाचलेल्या पैशांतून गरीब, उपेक्षित, अनाथ, गरजूंना मदत करुन त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थी दरवर्षी करतात.
प्रा. अमोल अहिरे, हिरवांकुर फाउंडेशन नाशिक

