
तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी साकारले आकर्षक व पर्यावरणपूरक आकाश कंदील!
नांदगाव, दि. ३१ ऑक्टोबर २०२६ :
दिवाळी सणाचे औचित्य साधून येथील जे. टी. कासलीवाल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी आकाश कंदील तयार करण्याच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत विद्यालयातील तब्बल ३०० विद्यार्थ्यांनी एकाच वेळी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कल्पकतेतून सुंदर, आकर्षक व पर्यावरणपूरक आकाश कंदील तयार केले.
विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या सर्जनशीलतेला चालना मिळावी तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्वयंनिर्मितीचा आनंद आणि कौशल्यविकासाची भावना निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यालयाचे प्राचार्य श्री. मनी चावला यांच्या पुढाकाराने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकर्षक सजावटीचे साहित्य आणि पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून अत्यंत कमी खर्चात व कमी वेळेत सुंदर आकाश कंदील तयार केले. स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या या कंदिलांमुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान ओसंडून वाहत होते. विद्यार्थ्यांना हे आकाश कंदील आपल्या घरासह वर्गखोल्यांच्या सजावटीसाठी वापरता येणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या कार्यशाळेसाठी विद्यालयाचे चित्रकला शिक्षक श्री. निलेश पाटील यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आकाश कंदील तयार करण्याच्या विविध कलात्मक पद्धती समजावून सांगितल्या. विद्यार्थ्यांनीही अतिशय उत्साहाने आणि कल्पकतेने या उपक्रमात सहभाग घेतला. संपूर्ण शाळेत आनंदी, उत्साही आणि सर्जनशील वातावरण निर्माण झाले होते.
या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मा. श्री. सुनीलकुमारजी कासलीवाल, सेक्रेटरी मा. श्री. विजय चोपडा, प्रमिलाताई कासलीवाल, सुशीलभाऊ कासलीवाल, रिखबकाका कासलीवाल, जुगलकिशोरजी अग्रवाल, महेंद्रभाऊ चांदिवाल यांनी विशेष कौतुक केले. तसेच प्राचार्य श्री. मनी चावला, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणारा आणि पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यालयासाठी निश्चितच अभिमानास्पद ठरला.

