
नांदगाव ( प्रतिनिधी )जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोंगरमाथा पिंप्री हवेली येथे दिवाळीच्या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा,विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरू राहावे आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी,या उद्देशाने विद्यार्थ्यांना दिवाळी सुट्टी कृतिपुस्तिकांचे वाटप करण्यात आले.या कृतिपुस्तिकेच्या माध्यमातून विद्यार्थी सुट्टीच्या काळातही विविध शैक्षणिक कृती,मनोरंजक उपक्रम आणि सरावाच्या माध्यमातून आपल्या ज्ञानाची उजळणी करू शकतील.अभ्यासासोबतच कृतीतून शिकण्याची गोडी वाढावी आणि विद्यार्थ्यांनी आनंददायी पद्धतीने शिक्षण सुरू ठेवावे,हाच या उपक्रमामागील मुख्य हेतू असून सुट्टी असली तरी शिक्षण थांबणार नाही,कृतीतून शिकण्याचा आनंद कमी होणार नाही!या उदात्त भावनेने मुख्याध्यापक कल्याण पाटील सर,उपशिक्षक रामचंद्र पाटील सर यांनी कृतिपुस्तकेची वाटप केले.तसेच विद्यार्थ्यांसोबत आनंदात दिवाळी साजरी व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना लाडू,चिवडा,शेव,पापडी,शंकरपाळे आणि करंजी अशा विविध दिवाळीच्या फराळातील पदार्थांची मेजवानी देण्यात आली.

विद्यार्थ्यांसोबत दिवाळीचा आनंद वाटून घेतांना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले निरागस हास्य,डोळ्यांतील चमक आणि मनातील उत्साह पाहून मन अगदी आनंदून गेल्याचे शिक्षक रामचंद्र पाटील सर यांनी सांगितले,तर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हेच आमच्यासाठी सर्वांत मोठे बक्षीस त्यांच्या आनंदात सहभागी होणे,त्यांच्यासोबत सण साजरा करणे आणि शाळेच्या प्रांगणात आनंदाचे क्षण फुलवणे,हीच या उपक्रमाची खरी फलश्रुती!दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा प्रकाश नव्हे,तर आनंद वाटण्याचा,नाती जपण्याचा आणि प्रेमाची गोडी वाढवण्याचा सण! असल्याचे मुख्याध्यापक कल्याण पाटील सर यांनी याप्रसंगी उपस्थितांना सांगितले.

