
मातीचा सुगंध… ज्ञानाचा प्रकाश… संस्कृतीचा रंग…आदिवासी बांधवांसोबत नमस्ते नाशिक फाउंडेशन दिवाळीच्या आनंदात दंग!
‘आनंदाची दिवाळी… ज्ञानाची ज्योत… सक्षम समाजाच्या परिवर्तनाची पहाट!’ या संकल्पनेतून नमस्ते नाशिक फाउंडेशनतर्फे पेठ तालुक्यातील आदिवासी पाड्यावर दिवाळी आनंदोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत १०० हून अधिक आदिवासी महिलांना साड्या व ब्लाउज पीसचे वाटप करण्यात आले. तसेच महिला-पुरुषांना नवीन कपडे, लहान मुलांना वस्त्रे व शैक्षणिक साहित्य, कुटुंबांना दिवाळी फराळ, मिठाई, आकाशकंदील व पणत्यांचे वाटप करून आनंदाची दिवाळी साजरी करण्यात आली.

वस्तुरूप मदतीसोबतच जनजागृतीचा ज्ञानदीप!
या उपक्रमाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, मुलींचे शिक्षण, महिला सुरक्षा, स्वसंरक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ, आरोग्य, अंधश्रद्धा निर्मूलन, सर्पदंश प्रतिबंध व प्रथमोपचार तसेच शासकीय योजनांविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कापडणीस साहेब यांनी आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध शैक्षणिक सुविधा व शासकीय योजनांची माहिती दिली. पेठ तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री. संदीपकुमार बोरसे यांनी ‘पोलीस आपले मित्र… भीती नव्हे, विश्वासाचे नाते!’ या विषयावर मार्गदर्शन करत महिला सुरक्षा, रस्ता सुरक्षा आणि पोलिसांची मदत घेण्याच्या प्रक्रियेविषयी संवाद साधला. तसेच सर्पदंश झाल्यास अंधश्रद्धा व घरगुती उपचार टाळून तातडीने वैद्यकीय उपचार घेण्याचे आवाहन करण्यात आले. फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ. स्नेहल संदीप देव यांनी हास्ययोगाचे प्रात्यक्षिक घेऊन ग्रामस्थांना तणावमुक्त जीवन, सकारात्मक विचार आणि आनंदी आरोग्याचा संदेश दिला. त्यांच्या हास्ययोग सत्रामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित झाला. यावेळी सौ. स्नेहल संदीप देव म्हणाल्या, “तात्पुरती मदत आनंद देते… ज्ञान नवी दिशा देते… आणि जनजागृती समाजाला सक्षम बनवते! केवळ वस्तुरूप मदत देणे हा आमचा उद्देश नसून शिक्षण, आरोग्य, महिला सुरक्षा आणि शासकीय योजनांच्या माहितीतून प्रत्येक कुटुंब स्वावलंबी व सक्षम व्हावे, हाच आमचा संकल्प आहे.”
या कार्यक्रमाला खासदार खासदार भास्कर भगरे यांनी कार्यक्रमाचे कौतुक करत नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या सामाजिक कार्याची प्रशंसा केली. तसेच, अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम दिंडोरी मतदारसंघातील विविध भागांत राबविण्याचे आवाहन केले. यावेळी दानशूर व्यक्तिमत्त्व वृंदा लवाटे यांचे संस्थेला मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या सहकार्यामुळे उपक्रमाला विशेष बळ मिळाले. सहायक प्रकल्प अधिकारी श्री. राजेंद्र महाले, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. कापडणीस साहेब, श्री. गिरीश गावित, श्री. गणेश येवले, श्री. दिनेश कोठावदे, सौ. आशाताई शिरसाट, सौ. अरुणा वाणी, मटाले मामा आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यकारी समिती प्रमुख सौ. अलका येवले, श्री. संदीप देव यांच्यासह फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य व स्वयंसेवक यांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.
नमस्ते नाशिक फाउंडेशन, नाशिक
✨ जिथे कमी, तिथे आम्ही! ✨

