
नाशिक दिनांक १२ नोव्हेंबर : छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने आयोजित १७ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय फेंसिंग स्पर्धेत विरल म्हस्के याने कांस्यपदक पटकावत नाशिक जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विरल आणि त्याचे प्रशिक्षक प्रसाद परदेशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
या यशाच्या जोरावर जम्मू-काश्मीर येथे दिनांक १२ ते १५ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या ७० व्या राष्ट्रीय शालेय फेंसिंग स्पर्धेसाठी विरलची निवड झाली आहे. विशेष अभिमानाची बाब म्हणजे विरलची ही सलग तिसरी राष्ट्रीय स्पर्धा आहे.
याआधी विरलने शालेय १४ वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत दोन वेळा सहभाग घेऊन राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. तर राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धेत १२ वर्षांखालील स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते तर १७ वर्षांखालील स्पर्धेतही फेडेरेशन स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले होते.
यावेळी १७ वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावून सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय स्पर्धेसाठी तो पात्र ठरला आहे.
विरलच्या या यशाबद्दल नाशिक जिल्हा फेंसिंग असोसिएशनचे पदाधिकारी अशोक दुधारे, आनंद खरे राजू शिंदे, अजिंक्य दुधारे, दीपक निकम, राहुल फडोळ, जय शर्मा, सॅक्रेड हार्ट स्कुलच्या प्राचार्य टेसी अँटो, क्रीडा शिक्षक गणेश राऊत, भाग्यश्री पगारे यांनी त्याचे अभिनंदन करून पुढील राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

