
पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रकला स्पर्धेतील सहभागी चाळीस विद्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजेंद्र खताळे यांच्या हस्ते चित्रकला व लेखन साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याबरोबरच सर्जनशीलतेला चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. स्पर्धेत सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचा सन्मान करून त्यांना चित्रकला व लेखन साहित्य भेट देण्यात आले. या उपक्रमाबद्दल विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष निवृत्ती कराड, रामहरी खताळे, मुख्याध्यापक वसंत गोसावी, पदवीधर शिक्षक सुनील जोरी तसेच स्वाती खताळे, कैलास पवार, मीना सोनवणे, प्रतिभा पवार, प्रियंका वाघ आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा शैक्षणिक व प्रेरणादायी उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.

