
मालेगाव (प्रतिनिधी): युवक क्रांती दलाचे संस्थापक, संपादक, महात्मा गांधी स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष, साप्ताहिक सत्याग्रही विचारधाराचे संपादक,माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी यांचे पुणे येथे निधन झाले. त्यांना मालेगांवी प.बा. काकाणी नगर वाचनालय येथे अभिवादन करण्यात आले.
मालेगावच्या बी. एड. कॉलेजच्या कॅपिटेशन फी विरोधात झालेल्या आंदोलनामुळे डॉ. सप्तर्षी यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. तसेच माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांच्या भारत जोडो यात्रेदरम्यान त्यांनी आयोजकाच्या भूमिकेतून मालेगावशी दृढ नाते निर्माण केले होते. संपूर्ण आयुष्यभर गांधी विचारसरणीचा अंगिकार करीत, त्यांनी अहिंसा, सत्य, त्याग व प्रेमाची शिकवण दिली.
युवकांच्या शक्तीवर त्यांचा मोठा विश्वास होता,अशा शब्दाते मान्यवरांनी शोकसभेत भावना व्यक्त केल्या. काकाणी वाचनालयाचे अध्यक्ष अजय नवलराय शाह अध्यक्षस्थानी होते. डॉ. सप्तर्षी यांचे बंधू प्रा. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिवादन सभा झाली.
वाचनालयाचे सहकार्यवाह रविराज सोनार यांनी सुत्रसंचालन केले. यावेळी नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, भास्कर तिवारी, मिलिंद गवांदे, शाहीर प्रकाश वाघ, सुभाष(ताऊ) परदेशी, पुणे येथील युक्रांतचे कार्यकर्ते अप्पा अनारसे, नसीम अहमद, भिला महाजन, बळवंत अहिरे, उर्दू लायब्ररीचे ग्रंथपाल आसिफसाहेब यांच्यासह साथी प्रतिष्ठान, राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

