
सोनांबे ता. 31: पाटोळे (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने जोगेश्वरी माता मंदिर डोंगर परिसरात आयोजित करण्यात आलेली पर्यावरणपूरक पावसाळी वनभोजन सहल विद्यार्थ्यांसाठी ज्ञान, आनंद आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा अविस्मरणीय अनुभव ठरली. निसर्ग निरीक्षणासोबतच परिसर स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

उपक्रमशील शाळेचे मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या संकल्पनेतून आयोजित या सहलीत विद्यार्थ्यांनी शाळेपासून जोगेश्वरी माता मंदिरापर्यंत सुमारे दीड किलोमीटरचा प्रवास करताना निसर्गाचे बारकाईने निरीक्षण केले. याचवेळी परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा करून पर्यावरण संवर्धनाचा आदर्श घालून दिला. विद्यार्थ्यांनी तब्बल पन्नास किलो क्षमतेच्या दोन पिशव्या भरतील इतका प्लास्टिक कचरा संकलित केला. हा कचरा ग्रामपंचायतीच्या प्लास्टिक कचरा संकलन व विघटन केंद्रात सुपूर्द करण्यात आला.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी “निसर्गाचे निरीक्षण आणि पर्यावरणाचे संवर्धन” हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून अनुभवला. जोगेश्वरी माता मंदिरात दर्शन घेतल्यानंतर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यात आले. वनभोजनाचा आनंद घेत विद्यार्थ्यांनी निसर्गाशी सुसंवाद साधला. विशेष म्हणजे, याच डोंगर परिसरात मागील वर्षी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध वृक्षांच्या बियाण्यांची पेरणी करून हरित संवर्धनाचा उपक्रम राबविला होता. त्या उपक्रमाची यंदाही विद्यार्थ्यांनी आठवण जागवित पर्यावरण रक्षणाचा संकल्प दृढ केला.
मुख्याध्यापक वसंत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर शिक्षक सुनिल जोरी, स्वाती खताळे, सुनिता बर्वे, कैलास पवार, मिना सोनवणे, प्रतिभा पवार आणि प्रियंका वाघ यांनी सहलीचे उत्कृष्ट नियोजन व संयोजन केले.
शाळेच्या या अभिनव व पर्यावरणपूरक उपक्रमाबद्दल गटशिक्षणाधिकारी राजेश डामसे, शिक्षण विस्तार अधिकारी कैलास सांगळे, केंद्र समन्वयक विजय निरगुडे तसेच विविध पदाधिकारी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी शाळेचे व विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

