
ओझर : दि.२ (वार्ताहर)धावपळीच्या युगात अनेक सुखद दुःखद प्रसंग, घटना परिसरात घडत असतात. असाच एक प्रसंग ओझरच्या पंचवड गणेश मंदिर परिसरात घडला. दुपारची वेळ होती. यावेळेस सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी शोभा मौले विधाते नावाची महिला गणेश मंदिर रस्त्याने जात असताना त्यांची दोन तोळ्याची चैन व एक्कावनशे रुपये रक्कम असलेली पर्स हरवल्याचे घरी गेल्यावर त्यांच्या लक्षात आले. त्या महिला घरात, रस्त्याने पर्सचा शोध घेऊ लागल्या.
मंदिराजवळील रस्त्याने बोरस्ते विद्यालयाचे कलाशिक्षक मोहन क्षीरसागर शासकीय मीटिंगसाठी जात असताना रस्त्यावर पडलेल्या पर्सकडे त्यांचे लक्ष गेले. त्यांनी पर्स उचलून घेतली. आणि ही वस्तू ज्याची आहे त्याला परत केली पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला.

थोड्या वेळातच पर्स हरवलेली महिला शोभा मौले विधाते रडतच मंदिर परिसरात आल्या. मंदिराच्या गाभाऱ्यात इकडे तिकडे भरपूर शोध घेतला असता पर्स सापडली नाही. मात्र मंदिर परिसरात महिला पर्स शोधत असल्याचे मोहन क्षीरसागर यांच्या लक्षात आले. पर्स सापडल्याची माहिती देऊन शोभा मौले यांना आपल्या घरी नेऊन दोन तोळ्याची सोन्याची चैन व पाच हजार शंभर रुपये, असा तीन लाख एक्कावनशे रुपये रक्कमेचा ऐवज प्रामाणिकपणे परत करून शिक्षकी पेशातील प्रामाणिकपणा व माणुसकीचा प्रत्यय शिक्षक दांपत्य मोहन क्षीरसागर व पत्नी पूजा यांच्या रूपाने त्यांना अनुभवास मिळाला. यावेळी आनंदाश्रू ढाळत मौले मावशींनी, माझ्यासाठी साक्षात तिथे देव अवतरले! असे उदगार काढत क्षीरसागर कुटुंबीयांचे मनापासून आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली. खरोखर क्षीरसागर कुटुंबीयांनी सर्वांसमोर खूप मोठा आदर्श ठेवून जगात आजही माणुसकी, प्रामाणिकता असल्याचे सिद्ध केले.

