

नांदगाव (प्रतिनिधी, गणतंत्र न्यूज)
संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त नांदगाव येथे अखंड हरिनाम सप्ताह, तुकाराम गाथा पारायण, श्री शिवमहापुराण कथा व हरिकीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा बुधवार, दि. ५ ऑगस्ट ते बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत संत सावता महाराज मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.

या सोहळ्यानिमित्त आंतरराष्ट्रीय वारकरी कीर्तनकार आचार्य ह.भ.प. विनोदकृष्ण महाराज शास्त्रीजी (नायगावकर) यांच्या सुसंवाद वाणीतून दररोज दुपारी २.३० वाजता श्री शिवमहापुराण कथामृताचा लाभ भाविकांना मिळणार आहे. तसेच रात्री ८ ते ११ या वेळेत हरिकीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी ह.भ.प. विजय महाराज काळे (पिंपळनेरकर) यांचे विशेष कीर्तन होणार असून, बुधवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सकाळी ह.भ.प. उमेश महाराज दशरथे यांचे काल्याचे कीर्तन होऊन महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
या धार्मिक कार्यक्रमात ह.भ.प. गंगाराम महाराज राऊत (पैठण), ह.भ.प. तुकाराम महाराज मुळीक (आळंदी), ह.भ.प. सुधाकर महाराज (पैठण), ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, ह.भ.प. मंगेश महाराज वनहाडे व ह.भ.प. अर्जुन महाराज मोटे (जालना) यांची कीर्तने होणार आहेत.
आठवडाभर चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात काकडा भजन, प्रभात फेरी, तुकाराम गाथा पारायण, श्री शिवमहापुराण कथा, हरिपाठ व हरिकीर्तन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश आहे. संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघणार असून, पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संत सावता महाराज उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

