
शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते प्रा. अमोल अहिरे यांचा सन्मान करतांना
नाशिक (वार्ताहर) – दाभाडीचे (जि. नाशिक) भूमिपुत्र, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी नाशिक शाखेचे माजी नगरप्रमुख प्रा. अमोल अहिरे यांनी गत सात वर्षांपासून (३१ मे २०१७ पासून) संकल्पपूर्वक अखंडित व सातत्यपूर्णरित्या ३३३३ दिवस विवेकानंदांच्या विचारांचा प्रचार व प्रसार वर्तमानपत्र व बारा राज्यातून विविध दहा भाषेतून समाज माध्यमातून करत जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यांचा मुंबईत शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या हस्ते जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र गौरविण्यात आले. यावेळी ना. भुसे यांनी अहिरे यांच्या सातत्यपूर्ण कार्याची प्रशंसा केली.

मालेगाव तालुक्यातील जळगाव निंबायती येथील जी. वाय. पाटील कनिष्ठ महाविद्यालयात गेल्या अठरा वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापक पदावर कार्यरत असलेले अहिरे यांनी २०१७ मध्ये विवेकानंद केंद्राच्या सात दिवसीय निवासी व्यक्तीमत्व विकास शिबिरात सहभाग नोंदविला होता. समारोप कार्यक्रमात त्यांनी दररोज विवेकानंदांच्या साहित्याचे वाचन करुन ‘विवेक विचार’ नामक संदेशातून त्यातील तत्त्वाचा प्रचार व प्रसार सोशल मिडियाच्या माध्यमातून करण्याचा संकल्प केला होता. वर्षभरानंतर नियमित वाचकांनी आग्रह धरल्याने सदर उपक्रम सलगपणे नऊ वर्षापासून राबविला जात असून, त्याची नोंद जागतिक विक्रमात झाली आहे.
सदर सातत्यपूर्ण उपक्रमाची दखल लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड संघटनेने घेतली आहे. यापूर्वीही प्रा. अहिरे यांचे अकरा जागतिक विक्रम झालेले आहेत. नुकतेच लंडन बुक तर्फे प्रा. अहिरे यांना जागतिक विक्रम केल्याबद्दल प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह व सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले. यापूर्वी अहिरे यांनी विद्यार्थ्यांची अध्यापनात रुची वाढावी त्यांचा सर्वागीण विकास व्हावा, या उद्देशाने अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहे. शिवाय त्यांचे विविध दैनिकांतून अनेकविध विषयावर तब्बल ८६० हून अधिक लेख प्रकाशित झाले आहे. तसेच अनेक शाळा, महाविद्यालयातून व्याख्याने दिली आहे. त्यांना ५१ हून अधिक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. आगामी काळात लिखित विचारांबरोबर ‘विवेक वाणी’ या ध्वनीमुद्रित संदेशांचे प्रसारण करण्याची इच्छा अहिरे यांनी यावेळी व्यक्त केली.
विविध दैनिकांतून प्रकाशित –
‘विवेक विचार संदेश’ उपक्रमाची दखल राज्यातील विविध दैनिकांनी घेतली असून पाच दैनिकांमधून सातत्याने सदर संदेश प्रकाशित केले जात आहेत. संदेशातील विचारांची पुनरावृत्ती होत नसल्याने वाचकांनी जिज्ञासा टिकून आहे. यातील नाविन्यता व कल्पकता हे या उपक्रमाचे वैशिष्ट्य आहे.
– दहा भाषांमधून प्रचार
मराठी, हिंदी, इंग्रजी, कानडी, तेलगू, तमिळ, मल्याळम, गुजराती, बंगाली आणि संस्कृत भाषांमधून देशातील बारा राज्यात ‘विवेक विचार संदेश’ नियमित प्रसारित होतो.
विदेशात देखील प्रसारण
अमेरिका, युनायटेड किंगडम
मॉरिशियस या देशातील भारतीय लोक इंग्रजी भाषेतून सदर संदेशाचे समाज माध्यमातून प्रसारण करत आहे. देशी-विदेशातून तब्बल पाच लाखांहून अधिक लोकांपर्यंत सदर संदेश दररोज पहाटेच्या वेळी प्रसारित केला जात आहे.
वैशिष्ट्यपूर्ण संदेश
सदर संदेशात प्रा. अहिरे स्वतःचा नामोल्लेख करत नाही. यामुळे वाचक सदर विचार सहजपणे पुढे पाठवतात. शिवाय यात विवेकानंदांच्या संदेशाबरोबर दिनविशेष, तिथी, वार, भारतीय सौर, युगाब्द आदी देत असल्याने राज्यातील दोनशेहून अधिक शाळेच्या फलकावर शिक्षकांकडून या संदेशाचे दररोज लेखन केले जात आहे. त्यातील काही शाळेंच्या विद्यार्थ्यांनी ‘विवेक विचार संदेश’ नामक नोंदवहीत हे विचार संकलित केले आहेत.
– विवेकानंदांच्या प्रेरणादायी, राष्ट्रनिर्माणाच्या विचारांनी महाविद्यालयीन जीवनापासून मी खूप भारावून गेलो होतो. विवेकानंद केंद्राच्या माध्यमातून प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी एक चांगले व्यासपीठ मिळाले. या विचारांचे अनुसरण करुन वाटचाल करावी. तसेच या अनुकरणीय अशा जाज्वल्य विचारांचा प्रचार व प्रसार करावा, या ध्येयाने प्रेरित होऊन कामास सुरुवात केली. यात माझी भूमिका केवळ पोस्टमनची (विचारदूताची) असून, विवेकानंदांचे विचार विविध माध्यमातून मी जनसामान्यांपर्यंत पोहचवत आहे. हे वैचारिक अग्नीहोत्र असेच प्रत्येकाच्या हृदयात सतत तेवत रहावे व कृतीत यावेत याकरिता आगामी काळात विशेष प्रयत्न करणार आहे. शिवाय या संदेशांचे संकलन करुन पुस्तक प्रकाशित करण्याचा मनोदय आहे.
प्रा. अमोल अहिरे, नाशिक

