
लेखक :-गोविंद बभुता मोरे सर
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
एमव्हीपी समाज , नाशिक.
सिन्नर (चौगावकर)
9588431912
गीता हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ समजला जातो. प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपला परम भक्त अर्जुनाला केलेला उपदेश म्हणजे गीता . जीवनाचे तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ म्हणजे गीता . ज्ञानेश्वर महाराजांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत अनेक महान विभूतींनी गीतेविषयी लिहिले आहे. लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य नावाचा एक ग्रंथ लिहिला. गीतेचे रहस्य त्याच्या कर्म सिद्धांतात आहे असे ते म्हणतात. गीतेत एक श्र्लोक आहे..
कर्मण्यवाधीकारस्ते मा फलेषु कदाचन.
याच अर्थाचे हिंदी पिक्चरमध्ये एक गाणे होते..
करम किये जा
फलकी इच्छा
मत कर ऐ इंसान |
जैसा करम करेगा
वैसा फल देगा भगवान |
ये है गीता का ज्ञान
ये है गीता का ज्ञान ||
महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्राला थोर संतांची परंपरा लाभली आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी प्राकृत भाषेत ज्ञानेश्वरी लिहून सामान्य माणसासाठी ज्ञानाची कवाडे उघडी केली. एकनाथांनी दीन दुबळ्यांना ह्रदयाशी धरून जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला. भारुडांची रचना करून समाजातील दांभीकता नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संत तुकाराम महाराजांचे अभंग आजही आम्हाला प्रेरणादायी आहेत. ज्ञान ही कुणा एका समाजाची मक्तेदारी नाही हे तुकाराम महाराजांच्या गाथेने सिद्ध करून दाखवले. भगवंताची भक्ती करण्याचा हक्क प्रत्येक जाती धर्माला आहे हे वारकरी पंथाने दाखवून दिले. समाजात जागृती निर्माण करणारे अनेक संत आपल्या महाराष्ट्रात होवून गेले. असाच एक आगळा वेगळा संत होऊन गेला त्यांचे नाव संत सावता माळी. आपल्या वाट्याला आलेल्या कामातच राम आहे हे दाखवून देणारा संत आहे , संतशिरोमणी सावता माळी. आपल्या वाट्याला आलेले काम प्रामाणिकपणे करत राहणे हीच खरी ईश्वर सेवा आहे हे आपल्या कृतीतून लोकांना पटवून देणारे संत होऊन गेले ते म्हणजे संत सावता माळी.
दरवर्षी लाखो भाविक पंढरपुरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी जात असतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरूनही लाखो वारकरी हाती भगवी पताका घेऊन दिंडीत सामील होवून पायी चालत पंढरीची वारी करत असतात. वारकरी संप्रदायात अनेक संत महात्मे होवून गेलेत. अनेक कथाकार, प्रवचनकार, कीर्तनकार बुवा महाराज होवून गेलेत आणि आजही आहेत. दरवर्षी नित्यनेमाने पंढरीची वारी करणारेही खुप वारकरी आहेत. यांमध्ये सर्व आबालवृद्ध , स्त्री-पुरुष , सुशिक्षित अशिक्षित , गरीब श्रीमंत , शेतकरी कामगार या सगळ्यांचा समावेश आहे. पंढरीचा पांडुरंग हा शेतकरी , कामगार , कष्टकरी जनतेचा देव आहे. बहीणाबाई चौधरी आपल्या एका गाण्यात म्हणतात…
सोन्या रुप्यात सजला
मारवाड्यांचा बालाजी
शेतकऱ्यांचा विठ्ठल
पाना फुलातच राजी.
बालाजी हा श्रीमंतांचा देव आहे तर विठ्ठल हा गरीब शेतकऱ्यांचा देव आहे. बालाजी किंवा शिर्डीच्या साईबाबाला जश्या कोटींच्या कोटी देणग्या मिळतात तशा पंढरपूरच्या पांडुरंगाला मिळत नाहीत. कारण हा गरीब प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्यांचा देव आहे. मोठ्या भक्तिभावाने लोक पंढरपूरची वारी करत असतात. पण पांडुरंगाचे भक्त असून , पंढरपूर पासून जवळ अरण गावी राहत असून संत सावता माळी आषाढी एकादशीला पालखी बरोबर पंढरपूरच्या वारीला गेल्याचे उल्लेख नाहीत हे ऐकून आश्र्चर्य वाटते. सावता माळींचे चरीत्र वाचताना त्यांचे पंढरपूरची वारी न करण्याचे कारण आपल्या लक्षात येते .
संतशिरोमणी सावता माळी हे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या समकालीन होवून गेले. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अरण हे त्यांचे गाव. त्यांचे आजोबा पणजोबा हे नित्यनेमाने पंढरीची वारी करणारे होते. वडीलही वारकरी होते. लहानपणी सावताही वडीलांबरोबर पंढरीची वारी करायचे. शेती करणे , विहीर मोट नाड्याचा उपयोग करून शेतीत भाजीपाला पिकवणे हा माळी समाजाचा परंपरागत व्यवसाय सावता माळी करत असे. प्रपंचात राहूनही देवाची भक्ती करता येते हे त्यांनी जगाला दाखवून दिले. त्यासाठी जप , तप , पुजा अर्चा , तीर्थाटन करण्याची गरज नाही. आपले काम करत असताना विठ्ठलाचे नामस्मरण करावे असे ते म्हणत. त्यांच्या साठी त्यांचा विठ्ठल केवळ पंढरपुरातील मंदिरात नव्हता तर तो त्यांच्या सदा ह्रदयात विराजमान होता. ” देवानेच मला शेतात भाजीपाला पिकवायचे काम दिले आहे. ते काम करायचे सोडून मी पंढरपूरात जावून बसलो आणि इकडे शेतातील पिक करपले तर माझा विठ्ठल माझ्यावर रागवेल” अशी त्यांची धारणा होती. देवाने आपल्यावर सोपविलेले काम आपण प्रामाणिकपणे , इमानेइतबारे करावे. सतत नामस्मरण करावे म्हणजे वाईट विचार मनात येत नाहीत. दीन दुबळ्यांची सेवा करावी. अडल्या नडलेल्याला मदत करावी अशी सावता महाराजांची वृत्ती होती. इतर संतांप्रमाणे त्यांनीही अभंगरचना केलेली आहे. एका अभंगात ते म्हणतात..
आमुची माळीयाची जात
शेत लावू बागाईत |
आम्हा हाती मोट
पाणी जाते फुलझाड |
शांती शेवंती फुलली
प्रेम जाई जुई व्याली |
सावताने केला मळा
विठ्ठल देखीयेला डोळा ||
कांदा मुळा भाजी
अवघी विठाबाई माझी |
लसुन मिरची कोथिंबीरी
अवघा झाला माझा हरी |
ऊस गाजर- रातळू
अवघा झालासे गोपाळू |
मोट नाडा विहिर दोरी
अवघी व्यापीली पंढरी |
सावता म्हणे केला मळा
विठ्ठल पायी गोविला गळा ||
सावता महाराजांचा वरील अभंग आपल्याला त्यांच्या कार्याची दिशा दाखवतो. वरील अभंगातील मोट नाडा हे शब्द आजच्या पिढीला कळणार नाहीत. पुर्वी बहुतांश शेती ही कोरडवाहू होती. गावातील ठरावीक शेतकरीच मळा करीत असत. शेतात विहीर असायची. विहिरीजवळ मोटेने उपसलेले पाणी पडण्यासाठी थाळणे असायचे , त्याला लागून कुंड असायचे. विहीरीतील पाणी वर आणण्यासाठी चामड्याची किंवा लोखंडी पत्र्याची मोट असायची. मोटेला नाडा (जाड दोर) बांधलेला असायचा. विहीरीपासून उतारावर धाव असायची. मोट ओढायचे काम दोन बैल करायचे. मोटकरी मोटेने पाणी उपसायचे काम करायचा आणि त्याची सुगरण बारे द्यायची. मळ्यात जास्त करून भाजीपाला पिकवला जायचा.
सावता माळी आपल्या मळ्यात देवाचे नामस्मरण करत काम करत रहायचा. वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांना जेवू खावू घालायचा. आषाढी एकादशी येईपर्यंत बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील पेरणी होवून निंदणी व कोळपणी झालेली असायची. कोरडवाहू शेतात जास्त करून बाजरी ,ज्वारी , कुळीथ , भुईमूग ही पिके घेतली जायची. बाजरी ज्वारीच्या मध्ये मठ ,मुग , उडीद ही जोडपिके घ्यायची. भुईमूगच्या पिकात बांधाबांधाने तिळ असायची. आतमध्ये चवळी , राळा असायचा. कोळपणी नंतर शेतकरी निवांत व्हायचा. सोंगणीला बराच अवधी असायचा. कोळपणी झाल्यावर शेतात फारसे काम शिल्लक नसायचे. वेळ मोकळा असायचा. ज्यांना शेतात फारसे काम नसायचे असेच शेतकरी पायी दिंडीत पंढरपूर यात्रेसाठी जायचे. सावता माळी मळा करत असल्याने त्यांच्या कडे शेतात कायम कामे रहायची. म्हणून पंढरपूर जवळ असून आणि पांडुरंगाचे नि:स्सीम भक्त असूनही त्यांनी पंढरीची वारी केली नसावी.
आज सर्व संतांच्या पालख्या पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात पण संत सावता महाराजची पालखी पंढरपूरला जात नाही. उलट पांडुरंगाचीच पालखी पंढरपूरहून सावता महाराजांचे जन्मगाव अरण येथे सावता महाराजांना भेटायला जाते. आषाढ वद्य चतुर्दशीला सावता महाराजांची पुण्यतिथी असते. त्याच दिवशी पंढरपुरहून देवाची पालखी त्यांच्या आवडत्या भक्ताला भेटायला अरणगावी जाते. संत सावता माळी हा संत त्यांच्या समकालीन आणि उत्तरकालीन संतांपेक्षा वेगळा वाटतो. कर्मकांड आणि यज्ञ याग यांपेक्षा आपले कर्म आणि भक्तीभाव याला महत्त्व देणारा हा संत म्हणूनच संतशिरोमणी म्हणून गौरवीला गेला असावा. आपल्या कामाला महत्त्व देणारा हा संत कृतीशील समाजसुधारक वाटतो. कर्मकांड आणि अंधश्रद्धेच्या विळख्यात सापडलेल्या समाजाला मार्गदर्शन करणारा द्रष्टा वाटतो. शेतकरी असेल त्याने उत्तम शेती करून धन धान्य मिळवावे , शिक्षकाने आपले अध्यापनाचे काम प्रामाणिकपणे करावे , विद्यार्थ्याने आपले अध्ययन एक प्रकारची तपश्र्चर्या समजून करावे. डॉक्टर , इंजीनियर , नेता कुणीही असो देवाला स्मरून आपले काम प्रामाणिकपणे केले तर हीच खरी ईश्वर सेवा आहे हे संत सावता माळी यांचे चरित्र वाचले तर आपल्या लक्षात येते. महाराज एका अभंगात म्हणतात..
स्वकर्मी व्हावे रत
मोक्ष मिळे आपोआप |
तसेच..
प्रपंची असुनी परमार्थ साधावा
वाचे आठवावा पांडुरंग |
असे म्हणतात.
मोक्ष मिळवण्यासाठी घरदार सोडून , प्रपंचाचा त्याग करून , गिरीकंदरी एकांतात जावून तपश्र्चर्या करत बसण्याची गरज नाही. आपण पर्यटन करावे , तीर्थाटन करावे पण आपल्या मुख्य कामाकडे दुर्लक्ष होवू देवू नये .
सावता महाराजांचा कालावधी हा 1250 ते 1295 असा आहे. त्यांना अवघे 45 वर्षांचे आयुष्य लाभले. या तेराव्या शतकातच संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव होवून गेले. नामदेव महाराज ज्ञानेश्वर महाराजांपेक्षा वयाने मोठे होते. संपूर्ण भारतभर त्यांनी भ्रमण केले. पंजाबमध्ये काही वर्षे वास्तव्य करून पंजाबी भाषेत त्यांनी अभंग ओव्या लिहील्या आहेत. शिखांचा पवित्र ग्रंथ गुरूग्रंथ साहिबामध्ये त्यांच्या 62 ओव्यांचा समावेश करण्यात आला आहे. वारकरी पंथाला प्रतिष्ठा मिळवून देण्यात आणि वारकरी पंथाच्या प्रचार कार्यात नामदेव महाराजांचा फार मोठा सहभाग राहिला आहे. संत मांदियाळीत नामदेव महाराजांचा अधिकार खुप मोठा आहे. असे संतश्रेष्ठ नामदेव महाराज एके ठिकाणी म्हणतात…..
धन्य ते अरण
रत्नांचीच खान
जन्मले निधान
सावता तो..||१|
अजून एके ठिकाणी ते म्हणतात
सावता सागर
प्रेमाचा आगर |
माळ्या घरी
घेतला अवतार ||
धन्य त्याची माता
धन्य त्यांचा पिता |
साठविला दाता
त्रैलोक्याचा ||
नामा म्हणे त्याचा
जन्म सफल जाहला |
वंश उद्धरीला माळीयाचा ||
संत एकनाथ महाराज एके ठिकाणी म्हणतात..
माळीयाचे वंशी
सावता जन्मला
पावन तो केला
वंश त्यांचा ||
2020 , 21आणि 22 मध्ये संपूर्ण जगात कोरोणाचा कहर होता. या रोगाचा फैलाव होवू नये म्हणून वाहतूक आणि प्रवासावर बंदी होती. लोकांना क्वारंटाईन होवून घरातच बंदीस्त होवून रहावे लागायचे. सलग दोन तीन वर्षे पंढरपूरच्या जत्रेवरही बंदी होती. पंढरपूरला जाता आले नाही म्हणून काही वारकरी नाराज झाले. आपण सगूण निर्गुण परमेश्वराला मानतो. निर्गुणाची उपासना श्रेष्ठ समजली जाते. तसे असेल तर आपण घरीच राहून आपापली कर्तव्ये प्रामाणिक पणे पार पाडून ईश्र्वर सेवाच करतो आहोत असे समजायला पाहिजे. कणाकणात परमेश्वराचे रूप शोधायला आपण शिकले पाहिजे. त्याकाळात संत सावता महाराजची शिकवण लोकांना उपयोगी पडली. देवाविषयी महाराज एके ठिकाणी म्हणतात..
देव एवढा एवढा
खाकसाच्या दाण्याएवढा
देव केवढा केवढा ?
आभायातभी माये ना .||
केवळ देवळातील विठोबाच्या मुर्तीच्या दर्शनाने देव पावणार नाही. तसे असते तर देवाच्या दारी फुले विकणाऱ्याला त्याच त्या माळा परत परत विकण्याची बुद्धी झाली नसती किंवा दक्षीणेच्या लोभाने पुजाऱ्यांनी भक्तांना फसवले नसते. हे लोक तर कायम देवाच्या सान्निध्यात राहतात. त्यांच्यामधे किती साधुत्व यायला हवे होते? देवांना मंदिरात बंदीस्त करून त्यांच्या नावाने व्यापार करून भोळ्या भाबड्या समाजाला फसवून आपली तुंबडी भरून घेणारे देवाचे दलालही समाजात कमी नाहीत. आधी काम मग राम किंवा कामातच राम अशी वृत्ती हवी . मग वारीला जायला मिळाले नाही याचे वाईट वाटणार नाही. ‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी ‘
अशी वृत्ती असणाऱ्याला देव कधीच पावत नाही. ” Work is worship ” म्हणजे
‘ काम हीच पुजा ‘ किंवा
” Duty is deity ” म्हणजे ‘ कर्तव्य हीच देवता ‘ ही इंग्रजीतील सुवचनेही सावता महाराजांच्या विचारांचीच पुष्टी करतात.
” यज्ञ तो देव जाणावा ” हे मराठीतील सुवचनही कामाचीच महती पटवून देते. कोणतेही काम हलके किंवा भारी नसते. आपण ते काम किती सचोटीने करतो यावर त्या कामाचे मोल ठरते. कोणतेही काम करण्याची माणसाला लाज वाटायला नको. उलट काम न करता देवाच्या नावाने भीक मागून , ऐतखाऊपणाची लाज वाटायला पाहिजे. देव देवतांची , भुता खेतांची , ग्रह ताऱ्यांची , अतृप्त आत्म्यांची भिती दाखवून श्रद्धाळू भोळ्या भाबड्या लोकांना लुबाडून अंधश्रद्धा पसरवणाऱ्या लोकांना आपल्या कामाची लाज वाटायला पाहिजे. काहीही काम धंदा न करता भ्रष्टाचार करून आपली घरे भरणाऱ्या भष्ट व्यक्तींना आपल्या कर्माची लाज वाटली पाहिजे.
पुर्वीच्या ऋतुमानानुसार आषाढी एकादशीच्या आधी शेतकऱ्याची पेरणी व कोळपणी आटोपलेली असायची. कापणी किंवा सोंगणीला पुढे भरपूर अवधी असायचा. प्रवासासाठी इतर साधणे नव्हती. पायी चालण्याशिवाय गत्यंतर नव्हते. म्हणून भजन कीर्तन प्रवचन करीत लोकं पायी दिंडी काढायचे. जत्रा ,यात्रा समाज एक राहण्यासाठी आवश्यक होते. आता आपण बाराही महिने शेतीत पिके घेतो. शेतात पिकाला पाणी न देता शेतकरी वारीला गेला, इकडे शेत करपून गेले तर विठोबा त्याला दर्शनासाठी आला म्हणून बक्षीस देईल का शिक्षा करेल ? सावता महाराज पंढरपूर जवळ राहून वारीला जात नाहीत म्हणून त्यांना कुणी वाईट म्हणत नाही. उलट आज त्यांच्याच विचारांची जास्त गरज आहे.
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. पांडूरंग शास्त्री आठवले यांविषयी खुप छान विवेचन करायचे. ते म्हणत आजपासून देव चार महीने झोपून जातात. चार महिन्यांनी कार्तिकी एकादशीला उठतात. याचा अर्थ ते शेतीशी लावत. शेतकरी शेतीत धान्य पेरतो. म्हणजे ते बीज जमीनीत झाकले गेले. ते झोपले. चार महिण्यानंतर एका दाण्याचे शेकडो दाण्यात रूपांतर होऊन ते अवतरेल. प्रगट होईल. सहस्ररूपाने ते आपल्या समोर येईल. म्हणजे देव जागा होईल. चांगल्या प्रकारे शेतीत काम करून भरपूर उत्पन्न काढने हीच खरी शेतकऱ्यांची देवपूजा होय.
आमच्या लहानपणी आम्ही एक गाणे ऐकायचो
पाऊस पडला
चिखल झाला |
कशाला जाता इतक्या दूर ?
इथेच आहे पंढरपूर
इथेच आहे पंढरपूर ||
म्हात्ताऱ्या आई वडीलांची सेवा हीच खरी विठ्ठल रखुमाईची सेवा आहे. आई वडील ही देवाचीच रूपे आहेत. आई वडीलांना देव न मानणारा व त्यांना त्रास देवून घराबाहेर काढणारा माणूस पंढरपूरला जाऊन काय उपयोग ? म्हात्तारपणी आई वडील परावलंबी झालेले असतात. त्यांचा योग्य रीतीने सांभाळ करणे ही सुद्धा ईश्वर सेवाच आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग सर्वांनी नेहमी लक्षात ठेवावा असा आहे..
जे का रंजले गांजले
त्यांसी म्हणे जो आपुले
तोची साधू ओळखावा
देव तेथेची जाणावा ||
कर्माला महत्त्व देणाऱ्या सावता महाराजांचा संदेश आपणांपर्यंत पोहोचावा म्हणून हा इवलासा प्रयत्न. मी विज्ञान शिक्षक आहे. मी अंधश्रद्धा मानीत नाही. वरकरणी मी बराचसा नास्तीकच आहे. अंतर्यामी मात्र मी आस्तीक आहे. मी माझ्या परीने केलेली एक प्रकारची ईशसेवाच आहे असे मी मानतो. आध्यात्मिक ज्ञानात मी तज्ञ नाही. काही चुकले असेल तर माफ करावे ही विनंती.
मोरे गोविंद बभुता
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
एमव्हीपी समाज , नाशिक.
सिन्नर (चौगावकर)
9588431912

