– प्रा.जावेद शेख,सिन्नर
लेखक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
8329839434

▫️मुक्तेश्वर मंदिर कोणी बांधले जाणून घ्यायचे आहे?
▫️मुक्तेश्वर मंदिराचे प्राचीन नाव काय होते??
▫️मुक्तेश्वर मंदिराची रचना समजून घ्यायची आहे???
▫️सध्या मंदिराचे जीर्णोध्दार सुरू आहे,प्राचीन शिल्पांचे काय करायचे???
सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी खालील लेख अवश्य वाचा
मुक्तेश्वर मंदिर हे गोंदेश्वर मंदिराच्या समोर, सध्या विजयनगरच्या मागील बाजूस व सिन्नर–शिर्डी रस्त्यावरील ज्वाला माता लॉन्सच्या उत्तरेस, पूर्वी गवारे यांच्या लाल तांबड्या मातीतील शेतातील कमी उंचीच्या टेकाडावर उभे असलेले प्राचीन मंदिर होय.
🔸 मुक्तेश्वर मंदिर कोणी बांधले?
मुक्तेश्वर मंदिर कोणी बांधले याचा शिलालेख अथवा स्वतंत्र लिखित पुरावा उपलब्ध नसला, तरी त्याची ऐतिहासिक नोंद श्री चक्रधर स्वामींच्या लिळाचरित्रात आढळते.
पूर्वार्ध, लिळा क्र. २४५ मध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज गोंदेश्वर मंदिराला भेट देतात. त्यावेळी बाईसा गोंदेश्वर मंदिरासमोरील मंदिर कोणी बांधले, असे विचारतात. त्यावर महाराज सांगतात—
«“गोंदेश्वर पुढे पद्मेश्वरू… गोविंद व्यापाराने गोविंदेश्वर बांधले व पुढे जे मंदिर आहे ते पद्मा या व्यापाऱ्याने बांधले.”»
लिळाचरित्रातील कथनानुसार पद्मा हा गोविंदाचा भाचा होता. आईच्या एका बोलामुळे पद्मा तेलंग देशात जाऊन व्यापार करतो, धनद्रव्य कमावतो आणि आईने म्हटलेला शब्द खरा करून गोविंदेश्वर मंदिरापुढे पद्मेश्वर मंदिर बांधतो.
यावरून आज मुक्तेश्वर मंदिर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंदिराचे प्राचीन नाव ‘पद्मेश्वर’ होते व ते पद्मा या व्यापाऱ्याने बांधले, असा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक संदर्भ मिळतो. श्री चक्रधर स्वामी खोपडी मार्गे सिन्नरमध्ये आले होते आणि त्यांनी हे मंदिर प्रत्यक्ष पाहिले होते, त्यामुळे हा संदर्भ विशेष महत्त्वाचा ठरतो.
🔸मुक्तेश्वर मंदिराची रचना🔸
पूर्वी मंदिर सुमारे पाच फूट उंच दगडी अधिष्ठानावर उभे होते. मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना मुखमंडप, सभामंडप, अंतराळ व गर्भगृह अशी होती. आज फक्त अंतराळ व गर्भगृह मूळ स्थितीत असून मंदिराचे सध्या पुरातत्त्व विभागाकडून जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे.
🔸गर्भगृह
चौरसाकृती गर्भगृहाच्या मध्यभागी मूळ दगडी शिवलिंग आहे. छतावर पाटोडीयुक्त चौकोनी रचना व उमललेल्या कमळाचे कोरीवकाम आहे. चार कोपऱ्यांत अर्धस्तंभ असून तुळ्यांवर नागबंध आहेत. दक्षिण भिंतीत दिव्यासाठी लहान कोनाडा आहे. प्रवेशद्वार साधे, एकेरी द्वारशाखेचे असून दारतोरणावर शंकपाल नक्षीकाम आहे.
🔸अंतराळ
अंतराळ छोटा असून दोन्ही बाजूंना एकेक स्तंभ असून स्तंभपाद चौकोनी आहेत. स्तंभांवर नक्षीकाम, कीर्तिमुखे, नागबंधयुक्त चौफुलाची आधारशिला तसेच तीन चौकटीतील फुलांकृत शिल्पपट दिसतो.
🔹सभामंडप
सभामंडप पूर्णपणे पडलेला असून त्याचे छत व शिखरही शिल्लक नाही. त्यामुळे मूळ रचनेच्या निश्चित खुणा उपलब्ध नाहीत. नंदी सध्या नव्याने ठेवण्यात आलेला आहे.
🔸 🚩 शिल्पसंवर्धन काळाची गरज
मुक्तेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारादरम्यान मंदिराच्या दक्षिण बाजूस प्राचीन भग्नावशेष, कीर्तिमुख स्तंभ व शिळा विस्कळीत अवस्थेत पडलेले आहेत.मंदिरातील देवकोष्ठही रिकामे आहेत.त्यामुळे सिन्नर शहरात इतर ठिकाणी सदर शिल्पे असावी असा अंदाज आहे.
नवीन पिढीला केवळ नव्याने उभे राहिलेले मंदिर न दिसता त्याचा प्राचीन इतिहास व वास्तु-अवशेषही दिसणे आवश्यक आहे.
त्यामुळे उपलब्ध भग्न शिल्पांचे संकलन, शास्त्रीय पद्धतीने मांडणी, माहितीफलकांसह जतन व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे.
🚩 मुक्तेश्वर मंदिर म्हणजे केवळ मंदिर नाही; तो सिन्नरच्या प्राचीन इतिहासाचा, धार्मिक परंपरेचा,स्थापत्याचा आणि श्री चक्रधर स्वामींच्या प्रत्यक्ष ऐतिहासिक नोंदीचा अमूल्य वारसा आहे.त्याचे जतन व संवर्धन आपले आद्य कर्तव्य आहे.
🚩हर हर महादेव🚩
– प्रा.जावेद शेख,सिन्नर
लेखक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
8329839434
(सदर लेखासाठी फोटो हे पत्रकार विकास गीते यांच्या कडून व गुगल वरून घेतलेले आहे.)

