
सेवानिवृत्त सेवकांच्या सन्मान प्रसंगी मविप्र तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील व मान्यवर
नांदगाव:( प्रतिनिधी) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नांदगाव तालुक्यातील विविध शाखांमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा ‘समाज दिना’चे औचित्य साधून विशेष सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. मविप्र तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांच्या संकल्पनेतून आणि अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेच्या सर्व कर्मवीरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

प्रास्ताविक करतांना श्री विजय काकळीज यांनी कार्यक्रमाचा मूळ उद्देश व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे संस्थेच्या जडणघडणीतील महत्त्व विशद केले.
सोहळ्यात उपस्थित सर्व सेवानिवृत्त सेवकांना शाल, गुलाबपुष्प आणि सन्मानचिन्ह प्रदान करून त्यांच्या प्रदीर्घ सेवाकार्याचा गौरव करण्यात आला.
संस्थेप्रति आदरभाव व्यक्त करताना सेवानिवृत्त सेवक सुरेश नारायणे, मधुकर माळी ,प्रकाश फणसे, डॉ जी एस जैन, डॉ प्रज्ञा पगार यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
आपल्या अध्यक्षीय मनोगतात इंजि. अमित भाऊ बोरसे-पाटील यांनी सेवानिवृत्त सेवकांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना म्हणाले की, “सेवानिवृत्त सेवकांचा सन्मान म्हणजे सूर्यास्त नव्हे तर एक नव्या पर्वाची सुरुवात असून सेवानिवृत्त सेवक हे संस्थेचा खरा कणा आहेत. त्यांनी आयुष्यभर निष्ठापूर्वक दिलेली सेवा हीच संस्थेची खरी संपत्ती आहे”.
सुरुवातीला विद्यालयाच्या गीत मंचाने संगीत शिक्षिका कल्पना अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंद या जीवनाचा’ आणि ‘जीवन गाणे गातच राहावे’ ही स्वागतगीते सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या कार्यक्रमास मविप्र सभासद प्रभाकर कवडे, राजेश पाटील, रावसाहेब गायकवाड तसेच मविप्र सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष ॲड. उत्तम जाधव, सचिव कवी माणिक गोडसे, सहसचिव सुदामा आहेर सर्व पदाधिकारी, संचालक तसेच तालुक्यातील सर्व शाखांचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शीतल तासकर व ज्ञानेश्वर पगार तर आभारप्रदर्शन सिताराम पिंगळे यांनी केले. सर्व शाखांमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा सोहळा यशस्वीरीत्या पार पडला.

सेवानिवृत्त सेवकांच्या सन्मान प्रसंगी मविप्र तालुका संचालक इंजि अमित भाऊ बोरसे-पाटील व मान्यवर..

