
मोहाडी (प्रतिनिधी ): जीवनात कितीही अडचणी आणि संकटे आली तरी जिद्द, आत्मविश्वास व सकारात्मक दृष्टिकोनाच्या बळावर त्यावर मात करता येते. परिस्थितीचा बाऊ न करता ध्येय निश्चित करून प्रयत्नांची पराकाष्ठा केली, तर अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग नक्कीच सापडतो, असा प्रेरणादायी संदेश प्रसिद्ध उद्योजक व वक्ते मा. डॉ. भावेश भाटिया यांनी दिला.मोहाडी येथील श्री अष्टबाहू गोपालकृष्ण देवस्थान आयोजित व कर्मयोगी कै. एकनाथभाऊ जाधव फाउंडेशन संयोजित श्री अष्टबाहू गोपालकृष्ण प्रबोधन व्याख्यानमाला २०२६चे तिसरे पुष्प ‘अंधारातून उजेडाकडे…’ या विषयावर गुंफताना डॉ. भावेश भाटिया बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे संचालक डॉ. एस. के. शिंदे होते.हे पुष्प ग्रामस्थांच्या वतीने कुमारी तन्वी राजेंद्र जाधव हिच्या स्मृतीस अर्पण करण्यात आले.डॉ. भावेश भाटिया यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, प्रतिकूल परिस्थितीवर केलेली मात आणि उद्योजकीय वाटचालीतील अनुभव सांगत उपस्थितांना प्रेरित केले. अडचणींना संधीमध्ये रूपांतरित करण्याची वृत्ती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे. मनातील सकारात्मक विचार, मेहनत आणि ध्येयावरची निष्ठा यामुळे जीवनातील अंधार दूर करून यशाचा प्रकाश निर्माण करता येतो, असे त्यांनी सांगितले.यावेळी मविप्र संचालक प्रवीण जाधव, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष उत्तम जाधव, अरुण पिंगळे, केशव जाधव, मोहाडी येथील युवा उद्योजक जालिंदर गोवर्धने, राजेंद्र जाधव ांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमास मोहाडी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ, महिला, विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. व्याख्यानातून मिळालेल्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित भारावून गेले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विलास देशमुख सूत्रसंचालन धनंजय वानले तर आभार प्राध्यापक धनंजय देशमुख यांनी मानले.

