
सिन्नर : महाराष्ट्राच्या प्राचीन स्थापत्य व शिल्पपरंपरेचा अद्भुत आविष्कार असलेल्या ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिराच्या स्थापत्य, शिल्पवैभव आणि इतिहासाचा प्रत्यक्ष स्थळभेटीतून अभ्यास करण्याच्या उद्देशाने ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन – स्वरूप, प्रत्यक्ष स्थळभेट व चर्चात्मक संवाद’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. साहित्य भारती आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, सिन्नर शाखा यांच्या वतीने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

गोंदेश्वर मंदिराचे अभ्यासक आणि ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’ या पुस्तकाचे लेखक प्रा. जावेद शेख यांनी उपस्थितांना प्रत्यक्ष मंदिर परिसरात घेऊन जात मंदिराचे स्थापत्य व शिल्पवैभव उलगडून दाखविले. गोंदेश्वर मंदिराची भूमिज स्थापत्यशैली, पंचायतन मंदिर संकल्पना, नागर व द्रविड स्थापत्यशैलीतील घटकांचा झालेला मिलाफ, तसेच मंदिराच्या विविध स्थापत्य वैशिष्ट्यांची त्यांनी सविस्तर माहिती दिली.
मंदिराच्या शिल्पवैभवाची माहिती देताना प्रा. शेख यांनी रामायणातील प्रसंगांची शिल्पमालिका, विविध देव-देवतांची शिल्पे, वैशिष्ट्यपूर्ण शिल्परचना आणि मंदिराच्या स्थापत्यातील बारकावे प्रत्यक्ष शिल्पे दाखवत स्पष्ट केले. त्यामुळे उपस्थितांना केवळ पुस्तकातून नव्हे, तर प्रत्यक्ष स्थळावर शिल्पांचा संदर्भ समजून घेण्याची संधी मिळाली.
गोंदेश्वर मंदिराच्या रचनेमागील पंचायतन संकल्पना, स्थापत्यशैलीतील वैशिष्ट्ये आणि शिल्पांमधून व्यक्त होणारी सांस्कृतिक व धार्मिक परंपरा यांवरही यावेळी सखोल चर्चा झाली. मंदिर पाहताना कोणत्या दृष्टिकोनातून त्याचा अभ्यास करावा, शिल्पांचे अर्थ व संदर्भ कसे समजून घ्यावेत, तसेच इतिहास आणि स्थापत्य यांचा परस्परसंबंध कसा अभ्यासता येतो, याचे मार्गदर्शनही प्रा. शेख यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’ या पुस्तकातील विविध माहिती, मंदिराचा इतिहास, स्थापत्यशैली आणि शिल्पवैभव यासंदर्भात प्रा. जावेद शेख यांच्याशी चर्चात्मक संवाद साधला. पुस्तकातील मांडणी आणि प्रत्यक्ष मंदिरातील स्थापत्य-शिल्पवैभव यांची सांगड घालत झालेल्या या संवादामुळे कार्यक्रमाला अभ्यासपूर्ण स्वरूप प्राप्त झाले.
या चर्चात्मक प्रत्यक्ष भेटीत साहित्य अकादेमी,दिल्लीचे कार्यकारी मंडळ केंद्रीय सदस्य डॉ.नरेंद्र पाठक, मुंबईचे प्रादेशिक सचिव डॉ. अरुण ठोके, प्रा. राजाराम मुंगसे, रवींद्र कांगणे, शाहीर स्वप्नील डुंबरे, सोमनाथ एखंडे, वृक्षमित्र विष्णू वाघ, सुनीताताई वाळुंज, देवा थोरात आदी मान्यवर सहभागी झाले.
या अभिनव उपक्रमाचे प्रास्ताविक व नियोजन सुप्रसिद्ध कवी किरण भावसार यांनी केले. साहित्य, इतिहास, स्थापत्य आणि सांस्कृतिक वारसा यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून आणणारा हा उपक्रम गोंदेश्वर मंदिराच्या अभ्यासासाठी आणि वारसास्थळाविषयीची जाणीव अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.
चौकट
गोंदेश्वर मंदिराचे दर्शन घेताना हे पुस्तक मार्गदर्शक ठरेल
“महाराष्ट्रातील स्थापत्यशैलीचा अद्भुत आविष्कार म्हणजे ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा इतिहास, स्थापत्य आणि शिल्पवैभव या सर्वांची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी प्रा. जावेद शेख यांनी ‘गोंदेश्वर मंदिर दर्शन’ या पुस्तकातून केली आहे. इतिहास संशोधक, अभ्यासक आणि भाविकांना हे पुस्तक प्रत्यक्ष गोंदेश्वर मंदिर पाहताना मार्गदर्शक ठरेल.”
— डॉ. नरेंद्र पाठक
केंद्रीय सदस्य, कार्यकारी मंडळ, साहित्य अकादेमी, दिल्ली

