
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते थोर साहित्यिक रा.भालचंद्र नेमाडे यांचा ‘सटृक’ हा तिसरा कवितासंग्रह. याआधी त्यांचे ‘मेलडी’ (१९७०)’देखणी'(१९९१) हे दोन काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. पण त्यानंतर जवळजवळ ३३ वर्षानंतर त्यांचा हा कवितासंग्रह प्रकाशित होत आहे. या महाकवीचे इन- मीन- तीन कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत. एकोणाविसशे साठच्या दशकात कॉलेज तरुण असलेल्या नेमाडे यांनी प्रस्थापित साहित्यिक विशेषतः कादंबरीकार यांच्यावर टीका केली. तेव्हा प्रस्थापितांचे साहित्य प्रकाशित करणाऱ्या त्या प्रस्थापित प्रकाशकानेच त्यांना कादंबरी लिहिण्याचे आव्हान दिले. आणि त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसात त्यांनी ‘कोसला’ ही कादंबरी लिहून दिली. ती कादंबरी त्याच प्रस्थापित प्रकाशकाने छापली. आणि मग मराठी साहित्यात जे काही घडले तो इतिहास मराठी वाचकांना माहीत आहे. पण कादंबरीकार नेमाडे म्हणून जरी त्यांचा मराठी साहित्यात उदय झाला तरी ते प्रकृतीने मूलतः कवी आहेत. त्यांचा कवी म्हणून परिचय बऱ्याच उशिरा ‘मेलडी’ या कवितासंग्रहामुळे झाला. तसे ते कवी म्हणून त्यांच्या कादंबरी मधील वर्णनांमधून अस्फुटपणे व्यक्त होतच होते.
‘सटृक’हा पारंपारिक लोक वाङ्मयाचा प्रकार म्हणजे तमाशाचे देशी रूप. असे दस्तूरखुद्द नेमाडे आपल्या प्रस्तावनेमध्ये सांगतात. तर खानदेशी बोली भाषेत सटृक काढणे म्हणजे सटकवणे किंवा आजच्या बोलीभाषेत झापणे. प्रस्तुत कवितासंग्रहात तीन विभाग आहेत त्यात पहिल्या ‘सरवा’ या विभागात त्यांच्या पूर्वीच्या संग्रहात न आलेल्या पण इतरत्र प्रसिद्ध झालेल्या व काही अप्रकाशित कविता आहेत. ‘सरवा’ म्हणजे कापणीनंतर सांडलेले धान्य म्हणजेच उरलं सुरलं.
‘अस्तुरीमृग’ ह्या विभाग २ मध्ये स्त्री विषयक नव्या संकीर्ण अप्रकाशित कविता आहेत,तर ‘मृत्यू’ ह्या तिसऱ्या विभागात अगदी अलिकडल्या मृत्यूची चाहूल लावणाऱ्या गंभीर कविता आहेत.

पहिल्या ‘सरवा’ या विभागातील वीसेक कविता १९६० च्या पूर्वीच्या म्हणजे कवीच्या उदयकाळातील शाळा कॉलेजातील प्रकाशित अप्रकाशित कविता आहेत. त्यात नेमाडे ज्या पर्यावरणातून येतात त्या कृषी संस्कृतीचा ठसा असलेल्या आहेत. त्यात शेतकरी कुटुंबाची दैन्यावस्था ,अगतिकता येते. तशी ‘तमाशातील तरणी पोर’ बघून नादावलेली कविता येते. “छननछन छननन भिरभिर.. तमाशातील तरणी पोर”
तर कधी बालकवींच्या निसर्ग कवितेच्या वळणाने जाणारी ‘पाऊलवाट’ ही कविता येते. “शेतांमधूनही वळसे घेऊनी पायवाट सानुली चालली
गिरकी घेऊनि झुडुपांभवती झाडोऱ्यातून पहा सरकली “अशी यमक जुळवणारी छंदबद्ध अनुकरणातून आलेली कविता ते लिहून जातात. निसर्गाच्या सानिध्यात विलीन होणारी पाऊलवाट चोखाळताना त्यांच्यामधील भविष्यातील कवितेची नवी वाट चोखाळणारा नेमाडपंथी जागा होतो. आणि मग शेवट करताना तो म्हणतो ,
“नको येथील भुक्कड जीणे बथ्थड पुस्तकी कीडा होऊनि
अभ्यासातच दिवस न् रात्री देत परीक्षा घोकंपट्टी
कशी काढावी पुढली वर्षे मौज इथे तर काहीच नाही
नको नको मग आणू परती पुन्हा नको ही मानववस्ती”
एका सुखद निसर्गानुभूती नंतर या निसर्गकवितेच्या शेवटच्या चार ओळी मग कवितेच्या नंतरच्या (आफ्टरमथ) चिकटवलेल्या वाटतात. अर्थात आपल्याच कवितेमध्ये अशी कालांतराने जोडणी करणे हे कवीचे स्वातंत्र्य आहे आणि काही विशिष्ट परिणाम साधण्यासाठी जर ते कवीने केले असेल तर स्वागतार्ह ही आहे.
शाळेतील कवितांनंतर येणाऱ्या कॉलेजमधील तारुण्य सुलभ भावभावना व्यक्त करणाऱ्या रोमँटिक चार दोन कविता येतात. पण लगेच मर्ढेकरांची छाप पडल्यानंतर त्यांची कविता वेगळे वळण घेते आणि “चक्रांनो फिरत राहा” या कवितेतून त्यांची मर्ढेकरी प्रतिमासृष्टी दिसू लागते.
” तुम्ही रात्रींना लावून दिलं इलेक्ट्रिकचं गळू
त्यातून स्रवतो प्रकाशाचा पू” अशा ओळी लक्ष वेधून घेतात.
नेमाडेंच्या साठोत्तरी कविता सामाजिक चिंतनाचा आशय घेऊन येतात त्यात गांडकरी महाराजांचे अभंग म्हणजे तुकारामाच्या अभंगाची नक्कल वाटतात.
“हॉटेलातआम्ही जेवूनिया काय वृथा आहे भार संडासाला” या ओळी काय किंवा ” ब्रह्मचर्यांच्या मुठींना
नशा गृहस्थाश्रमींची
आहे स्नायूंची जिद्द
आम्हा सदा भाद्रपद” आणि “थोपटीत वस्त्रात वासना
रांडेच्या मनखुर्द टाळीपरि
नाचविले नागव्या मनाशी
तिच्या छब्यांना” अशा नंगट ओळी ते लिहून जातात.
नेमाडेंच्या कोसला, जरीला या कादंबऱ्यांच्या प्रसूतीपूर्व वेदनांच्याही कविता होतात. तेव्हा कोसला विषयी ते लिहितात
“होतीस पेशीमध्ये दडून कुठेतरी पहिल्यापासून ज्वालामुखी,
पंधरा दिवसात स्फोट करत उसळलीस..
कैकांच्या कादंबऱ्या त्यांच्या बरोबर सती जातात
तू मात्र मला पुरून उर..”
जरीला विषयी ते ‘आरती स्त्रीची’ म्हणून चक्क आरती करतात ‘वंदे मातरम’ या कवितेतून देशाविषयी लिहिताना ते राष्ट्र झाल्याने कसे भ्रष्ट झाले असे सांगतात. मुंबईसारख्या शहराविषयी ‘मुंबाआई’ या कवितेतून तिचे विदारक सत्य मांडतात.
” सगळ्या जगातून हुसकलेले बेघर आवारा तुझ्या पदराखाली भरभराटले,
वेश्या गुंडपुंड तस्कर जुगारी सुपारी देणारे- घेणारे बिल्डर माध्यमवाले नटनट्या सट्टेबाज सगळ्या जाति धर्माचे चोर भिकारी व्यापारी-
तुझ्यामुळे गबर झाले”
‘महाराष्ट्र संस्कृतीचा ओनामा’ मधून कवींच्या कुळांचा प्राकृत खंडकवी ते साठोत्तरी चंटकवी अखेरीस स्टंट कवी असा उद्धार ते करतात आणि मग महाराष्ट्र देशीच्या कवयित्रींची ज्या सातवाहन काळातील प्राचीन हलिकधारिणींपासून बहिणाबाई पर्यंतच्या लोककवयित्रींचा धांडोळा घेत या कवयित्री म्हणजे शुभसंकेत असल्याचे सांगतात. त्यासाठी ते वेगवेगळे आकृतीबंध (फाॅर्म) वापरतात. कोकणातील दशावतारांच्या ‘होय म्हाराज्या ss’ वापरून ते गाऱ्हाणं करतात. आधुनिक काळातील बालकांना रिझविण्यासाठी नव्या ढंगाच्या अंगाई ते रचतात.
” चांदोमामा चांदोमामा रुसलास का तीस मजली इमारती मागे लपलास का?” किंवा” एकुलतं एक लेकरू लाडाचं लग्नानंतर पाच वर्षांनी झालं घरात दुसरं भावंडही नाही मोठ्यांचा करतो हेवा सगळा खाऊ त्यालाच हवा” या नव्या ढंगाच्या बालकविता एक विदारक सत्य ही मांडतात .
“घरी आई नसते बाबा नसतो दिवसभर कसं सांभाळावं हे भूत मग काय द्या खाऊ गोळ्या चाकलेटी राहू द्या हाती मोबाईल कायम”
‘लालन पालन’, ‘मोत्या शीक रे एबीसी’ ‘बाराखडी’ या बालकविता केवळ विडंबनात्मक न राहता आजच्या वास्तवाशी जोडणाऱ्या वास्तववादी कविता होतात.त्यात,’ टणणण,णणणण, टटंणण’ अशा काही शब्दावलींचा वापर करून नाद निर्माण होतो, तेव्हा त्या पारंपारिक अंगाईगीतांप्रमाणे यमक जुळवून केलेल्या गेय कविता न राहाता सध्याच्या काळाचा नाद- स्वर घेऊन आलेल्या ‘नादिष्ट’ बालकविता होतात.
‘अस्तुरीमृग’ह्या दुसऱ्या विभागातील अठरा कविता ह्या भारतीय स्त्री जीवनाचा तळ शोधणाऱ्या कविता आहेत. यात खेड्यातील वर वधू पासून शहरी गृहिणीपर्यंतचे विषय येतात. स्त्री भ्रूणहत्त्ये वरील ‘नखुशी: किंवा नवऱ्याच्या अत्याचाराचा बळी ठरलेली :नवऱ्याने बडवलं’ अशा स्त्री जीवनाचं दाहक वास्तव मांडणाऱ्या कविता काळजाला घरं पाडतात. लोकगीताच्या अंगानं लिहिलेल्या ‘सासुरवाशीन’ ‘मी होच म्हणेन’, ‘जा मुली जा’ अंग नितळ नितळ’ या कविता म्हणजे”-बोलू नको सई काही हीच आपली कहाणी
लिहिलं कपाळी सासर सोडाया साठीच माहेर
यावं उभ्यानं उंबऱ्या आत निघावं आडव्यानं बाहेर”
स्त्री जीवनाच्या ‘मातृका’ म्हणून येणाऱ्या यौवन, मादी, वृद्धा या अवस्था चितारताना कवी जितका हळवा होतो, तितकाच वाचकही होतो. हे या स्त्रीवादी कवितांचं यश म्हणावं लागेल. स्त्री वादी कवी- कवयित्री आणि लेखक- लेखिकांना जे जमलं नाही ते या अल्पाक्षरी कवितांमधून नेमाडेंना कवी म्हणून अचूक जमल्याचा प्रत्यय येतो. ‘प्रेम गीत: सिंफनी’ या कवितेमधूनही स्त्री जन्माची जणू कहाणीच एका सिम्फनी मधून सांगीतिक रूपाने येते. तर कवीच्या आयुष्यात आलेल्या ज्या स्त्रिया त्याच्या कादंबऱ्यांमधून भेटलेल्या आहेत त्या इथेही भेटतात. ‘मातृसत्ताक ताई’ या कवितेमधील ताई त्यांच्या ‘हिंदू’ ह्या कादंबरीत ओझरती भेटलेली असते. पण अशा कर्तबगार स्त्रीच्या आयुष्यात ती आई म्हणून कितीही यशस्वी झाली असली तरी एकाकीपणामुळे ग्रासणाऱ्या दुःखाचा परिणाम एका शोकांतिकेत कसा होतो त्याचं या दीर्घ कवितेत होणारं दर्शन कवीला अगती करतं तसं वाचणाऱ्या प्रत्येकाला.
“ताई माथा टेकतो तुझ्या नारी तत्त्वाच्या आत्मसन्मानापुढे मी
तुझा सहोदर आपल्या पितृसत्ताक घराचा कुलदीपक कुचकामी”
‘अस्तुरीमृग’ मधील ह्या कविता म्हणजे तमाम शोषित स्त्रियांच्या वेदनांचा हुंकार आहे आणि तो कवीने जणू स्त्री जन्म घेऊनच व्यक्त केला आहे. कवी परकाया प्रवेश करतो पण कवी पुनर्जन्म न घेता याच जन्मात कसा नवा जन्म घेतो, याचे प्रत्यंतर या कविता वाचताना येते. तसेच स्त्री- पुरुष या
नात्यांमधील लंगभेदा (जेंडर) पलीकडे जाऊन कसे बघता येते याचा नवा दृष्टिकोनही वाचकाला मिळतो. हेच या कवितांचे अनन्य साधारण महत्त्व आहे. प्रत्येक संवेदनशील वाचकापुढे हे संवेदन जाणे हा कवीचा उद्देश आहे की नाही हे माहीत नाही पण ते घडले आहे हे खरे!
‘सट्टक’चा तिसरा विभाग ‘मृत्यू’ हा आहे. या विभागाच्या सुरुवातीलाच कवीने तुकारामाचा अभंग उद्धृत केला आहे.” मरणाही आधी राहिलो मरोनी|
मग केले मनी होते तैसे||
या विभागातील सर्व आठ कविता या दीर्घ कविता आहेत त्यात मृत्यू विषयी चिंतन आहे पण हे चिंतन पारलौकिक पातळीवर नसून ईहलौकिक पातळीवर असल्याने त्यात अबोध अध्यात्मिक गूढ नाही. वयपरत्वे कवीला लागलेली मृत्यूची चाहूल ही त्याचे सगे-सोयरे हे जग सोडून गेल्याने अधिक तीव्र होते. आणि हे जितके सहज तितकेच नैसर्गिकही आहे.
“जे जे आप्त घरातले जवळचे आजोळचे लाडके
मायाळू जन निवर्तले अधिमधी शेजारपाजारचे”
अशी मृत्यूची नांदी करून जणू तो या मृत्यू विषयक कवितांची भैरवी गात आहे. पण मृत्यूची तार्किक संगती शोधताना तो या मरण संकल्पनेने भित्रा न होता तिला धीटपणे सामोरा जात असल्याचे चित्र दिसते.
” म्हणतातचि पंडित भ्याड मरतसे हजार वेळा परि मरे शूर एकदाचि
असतोच मार्ग संकटकाळी बाहेर पडण्याचा उघडतो मात्र तो आतूनचि”
असे म्हणून तो आत्महत्येचेही उदात्तीकरण करताना देशासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्यांचा मृत्यू उत्तम, कर्जबाजारी शेतकऱ्याचा कर्जफेडीतून आत्महत्या करून येणारा मृत्यू मध्यम, तर अर्धी हयात परीक्षा देत शिकवत आणि परीक्षा घेत येणारा शिक्षकाचा मृत्यू कनिष्ठ. असे उपहासात्मक वर्गीकरण करतो. तर श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला गितोपदेश ( की हितोपदेश?) कसा मृत्यूला कारणीभूत ठरतो हे सांगताना एक नवीनच दृष्टीही देतो. ती म्हणजे “बुद्धोत्तर चातुर्वर्ण्य पुनरूत्थानात अख्खी गीता कृष्णाच्या तोंडी घुसडून फितवलं
अहिंसेचा साक्षात्कार झालेल्या अर्जुनाला विषादानं फेकलेलं गांडीव पुन्हा
हाती घ्यायला लावलं
समोरचे तुझे हे प्रियजन नाहीतरी भविष्यात मेलेलेच आहेत आता नाही मारलेस तरी
अशी ब्राह्मणी क्लृप्ती करून बौद्ध धर्म नष्ट केला रे माधवा तेधवा कुरुक्षेत्री केल्या किती विधवा?” मृत्यूविषयी असे अनेक भ्रम विभ्रम पाहून दाखवून शेवटी हे जगणं किती सुंदर होतं म्हणत आयुष्याचा सुखांत अखेरच्या ‘स्व’या कवितेतून करताना कवी म्हणतो
” आनंदात नांदून आपण हे दुःखद जग जगणीय केले भाऊ
आता आनंदात मरून मरणही स्मरणीय करून जाऊ”
नेमाडेंच्या ‘सटृक: ह्या कवितासंग्रहातून मांडलेले विषय आणि त्यांचा मला समजलेला आशय हा असा आहे. सटृक मध्ये ‘मेलडी’ मधील पारंपारिक मेलडी नाही आणि ‘देखणी’ मधील पारंपारिक देखणेपणही नाही. सटृकमध्ये सडेतोड, रोखठोक असा फटका आहे. नेमाडेंची कादंबरीतील गद्यशैली काव्यमय असते आणि कविते मधील पद्यशैली गद्यमय असते. सटृक मधील कवितांमध्ये कर्ता-कर्म- क्रियापद यांची एकमेकांशी फारकत झालेली दिसते.
ते त्यांच्या कवितांचा हा सरवा गोळा करताना त्यातील शब्दांचे दाणे मोत्यांसारखे कबुतरांसमोर टाकावेत तसे वाचकांसमोर टाकून वेचायला लावतात. आणि आपण ते टिपत जातो. नेमाडेंनी आपल्या आयुष्यभराचं शब्दसंचित या कविता संग्रहात भसाभसा ओतलं आहे. ते शब्दवैभव बघून वाचकांचे डोळे दिपतात. ते कोणत्याही छंदाच्या किंवा मुक्तछंदाच्या नादी लागत नाही. त्यांच्या स्व-तंत्र अशा ‘छंदीफंदी’ वृत्ती मधून स्वतःचा वृत्त छंद निर्माण करून कविता लिहितात. त्यांच्या एकेक शब्दाला लोककथा आणि लोकवाङ्मयाचा संदर्भ आहे. त्यांची कविता वाचण्यापूर्वी वाचकांना अशा अनवट लोकपरंपरेचा ओनामा घेणे आवश्यक आणि अनिवार्य आहे. नाही तर या कविता दुर्बोध जरी वाटल्या नाहीत तरी अबोध वाटतील. ज्यांनी नेमाडेंच्या कादंबऱ्या वाचल्या आहेत त्यांना सटृक वाचताना त्यांच्या कवितांचा धागा या कादंबऱ्यांमध्ये असल्याची नेणिव होते.
सटृक कवितासंग्रहा मधील कविता अशा विषय, आशय, आकृतीबंध या पारंपारिक मोजपट्टीने मोजता येणार नाहीत. त्यांनी चक्रधर तुकाराम मुक्ताई ते बहिणाबाई आणि महात्मा फुले यांच्या अखंड पासून आधुनिक नव कवितेचे जनक मर्ढेकरांपर्यंतचा वारसा घेऊन स्वतःची अशी एक छंदमुक्त नेमाडी काव्यशैली निर्माण केली आहे. लेखक नेमाडेंचे अनुकरण करत जसा लेखकांचा नेमाडपंथ निर्माण झाला तसाच भविष्यात त्यांच्या अनुयायांचा ‘नेमाडी’ हा काव्यपंथ निर्माण होण्याची शक्यता दिसते. तसे झाले तर हे सटृकचे मराठीला दिलेले एक देणं ठरेल. ते काही असो पण सटृकलेल्या नेमाडेंनी आपलं उरलं सुरलं सगळं काही सटृकच्या रूपाने मराठी कवितेला दान केले आहे, हे निश्चित!
विलास शेळके
नाशिक
मोबाईल:९४२२२६१८२६
पुस्तक: सट्टक (कवितासंग्रह)
कवी: भालचंद्र नेमाडे
प्रकाशक: पॉप्युलर प्रकाशन मुंबई
पृष्ठे:१५१ किंमत:रू.५००/-
तळटीप: सटृक या कवितासंग्रहातील अहिराणी बोली भाषेतील काही शब्दांचे अर्थ माझे जळगाव जिल्ह्यातील साहित्यप्रेमी वाचकमित्र आनंद महाजन यांनी कळविले आहेत.
सटृकच्या वाचकांना ते कविता समजून घेण्यासाठी उपयुक्त ठरतील म्हणून सोबत देत आहे.
१) सट्टक=सटकावणे
२)सरवा=कापणीनंतर गोळा केलेले उरलेसुरले धान्य
३)डीर=झाडाची छाटणी केल्यानंतर आलेल्या कोवळ्या फांद्या
४) उलगुलान=पिकांची काढणी झाल्यानंतर गुरं सोडण्याची अवस्था ५)लाणी=ज्वारीच्या पिकाची कापणी करून ती जमिनीवर आडवी करून त्यानंतर कणसे काढणे
६)उपलाणी= लाणी नंतर राहून गेलेली कणसे काढणे
७)गोखला=मातीच्या भिंतीमध्ये कोरलेला खण
८)सकवार=सुकुमार या शब्दांचा अपभ्रंश. कोमल, नाजूक या अर्थाने मुलीचे नाव सकवार ठेवले जाते.
९)भोवाडे=सोंग. ऐतिहासिक
कथानकाचे सोंगरूपी सादरीकरण
१०)जोजार= पसारा
११) जिवती=बालकांची रक्षण करणारी देवता (सटवाई)
१२)मुमुर्षू= मरणाची इच्छा असणारा , मरणासन्न
१३)तुरीय अवस्था=मनाची जागृत, स्वप्न,सुषुप्ति पेक्षा वेगळी चौथी अवस्था
१४)कषाय=औषधी गवती वनस्पती पासून केलेला तुरट काढा

