
मालेगाव ( प्रतिनिधी ): लाडोबा प्रकाशन, पुणे प्रकाशित ‘पाखरांची गाणी’ या बालकवितासंग्रहास जळगावच्या सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे स्व. दामू वासणकर यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा ‘राज्यस्तरीय सूर्योदय बालसाहित्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
बालसाहित्यिक राजेंद्र दिघे यांच्या ‘पाखरांची गाणी’ या बालकवितासंग्रहाला हा मानाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल साहित्य क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे या संग्रहाला सलग पाचवा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
बालमनाला आनंद देणाऱ्या, निसर्ग, पक्षी, प्राणी आणि बालविश्वाशी नाते जोडणाऱ्या कवितांमुळे ‘पाखरांची गाणी’ या संग्रहाने बालवाचकांचे लक्ष वेधून घेतले आहे. बालसाहित्याच्या क्षेत्रातील या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राजेंद्र दिघे यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
‘चपराक’ व ‘लाडोबा’ प्रकाशन, पुणे यांचे श्री. घनश्याम पाटील यांनीही राजेंद्र दिघे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यस्तरीय पुरस्काराची ही सलग पाचवी मान्यता ‘पाखरांची गाणी’ या बालकवितासंग्रहाच्या साहित्यिक गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारी असून, राजेंद्र दिघे यांच्या बालसाहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेणारी ठरली आहे.

