
नाशिक वार्ताहर नाशिक : जी. डी. सावंत वरिष्ठ महाविद्यालय,श्री. सिद्धिविनायक कनिष्ठ महाविद्यालय व एशियन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ विचारमंथन’ या ई-बुकचा प्रकाशन सोहळा उत्साहात घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे वंदन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी शिक्षण मंडळाचे सचिव मा. श्री. अशोक गुलाबराव सावंत होते. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे संचालक मा. डॉ. डब्ल्यू. एन. भेंडे उपस्थित होते.
कार्यक्रमात श्री. राजेंद्र सोमवंशी आणि श्री. मुकुंद ताकटे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले. छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या विचारांचा, कार्याचा आणि प्रेरणादायी योगदानाचा विविध पैलूंतून विचारमंथन करण्यात आले.
विद्यार्थिनी कुमारी अश्विनी निकम ने मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. यू. बी. पवार यांनी केले. प्रमुख अतिथींचे मनोगत मा. डॉ. डब्ल्यू. एन. भेंडे सर यांनी व्यक्त केले. संस्थेचे संचालक डॉ. डब्ल्यू .एन. भेंडे सर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी व राजमाता जिजाऊ यांच्या विषयी प्रकाशित झालेल्या ई-बुक मध्ये अधिक भर कशी घालता येईल व विद्यार्थ्यांना देखील याचा कसा फायदा होईल याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात मा. श्री. अशोक गुलाबराव सावंत यांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन समाजात कसे वावरावे व कुटुंबात कसे राहावे, निर्णय क्षमता कशी घ्यावी असे उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तुषार पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. दर्शन पाटील यांनी केले.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अशोक गुलाबराव सावंत, संस्थेचे संचालक डब्ल्यू एन भेंडे, एशियन इन्स्टिट्यूट फार्मसी चे प्राचार्य डॉ. कमलेश दंडगव्हाळ, डॉ यु. बी. पवार, कनिष्ठ विभाग प्रमुख एस. आर. शिंदे मॅडम आदींसह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

