
नाशिक,( प्रतिनिधी ) दिनांक ८ऑक्टोबर: नुकत्याच जपान येथील आयची, नागोया येथे २० व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नाशिकच्या निफाड तालुक्यातील देवगावचा राहिवाशी सर्वेश कुशारे याने उंच उडी या प्रकारात भारताचे प्रतिनीधीत्व करतांना सुंदर खेळाचे प्रदर्शन करून राजत पदक पटकावले.

खर तर या प्रकारात सुवर्ण पदक जिंकणारा चीन – तैपेई चा खेळाडू फू चाओ – ह्युआन आणि सर्वेश कुशारे या दोघांनीही २.२५ मीटर या उंचीवरून आपली उंच उडी मारली. केवळ सर्वेशने हे अंतर पार करताना दुसऱ्या प्रयत्नात ही उंची पार केली, तर चीन – तैपेईच्या फू चाओ – ह्युआनने पहील्याच प्रयत्नात ही उंची पार केली. केवळ या दोन संधीमुळे सर्वेशला रजत पदककावर समाधान मानावे लागले. आशियाई स्पर्धेत भारताला उंच उडीमध्ये तब्बल ५६ वर्षांनी पदक मिळाले आहे आणि ते आपला नाशिकच्या सर्वेशने मिळवून दिले आहे ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. कारण सन १९६६ मध्ये आशियाई स्पर्धेत भारताच्या भीमसिंग यांनी पदक मिळवून दिले होते.

सर्वेशच्या या अतुलंनीय कामगिरीबद्दल देवगाव, निफाड येथे नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे त्याचा गौरव करण्यात आला. यावेळी सर्वेशचे देवगावचे मुळचे प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनाही गौरविण्यात आले. कारण त्यांच्या सुरवातीच्या प्रयत्नामुळेच सर्वेशला उंच उडीमध्ये या स्तरापर्यंत जाता आले आहे.
या गौरव प्रसंगी नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, उपाध्यक्ष राहुल देशमुख, उपाध्यक्ष चंद्रशेखर सिंग, सचीव सुनील तावरगिरी, सह सचीव प्रशिक्षक वैजनाथ काळे, संदीप फुगट, एन.एस.काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सर्व मान्यवरांच्या हस्ते सर्वेशचा सत्कार करण्यात आला.
सर्वेशने याआधी मागील महिन्यात ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतासाठी रजत पदक पटकावले होते. तर २०२४ च्या पॅरिस येथील ऑलीम्पिकमध्येही सर्वेशने भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
नाशिक जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून नाशिकच्या खेळाडूसाठी विविध स्पर्धा, आणि वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, जेणेकरून नाशिकच्या जास्तीत जास्त खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे नांव जगामध्ये उंचवावे असे यावेळी हेमंत पांडे यांनी सांगितले.

