
धोंडबार ता. सिन्नर येथे ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ अंतर्गत धोंडबार शाळेत पाककृती स्पर्धाप्रसंगी रुपाली पगार, कैलास सांगळे, संदीप गिते, बाळासाहेब फड, देवचंद जाधव, प्रकाश जगताप, तानाजी पवार आदी
सिन्नर ( वसंत गोसावी, प्रतिनिधी), ता. 8 : धोंडबार (ता. सिन्नर) येथील जिल्हा परिषद शाळेत ‘प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना’ अंतर्गत पाक कृती स्पर्धा संपन्न झाली. यावेळी शालेय पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार, विस्ताराधिकारी कैलास सांगळे , विषय तज्ञ संदीप गिते, बाळासाहेब फड, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.देवचंद जाधव आदी उपस्थित होते.
पहिली ते सातवीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग घेत, आपल्या जिभेचे चोचले पुरवण्यापेक्षा आरोग्याला प्राधान्य देत भन्नाट व पौष्टिक पदार्थ बनवून आणून उपस्थितांची मने जिंकली.

रानभाज्या अन् पारंपरिक पौष्टिक पदार्थांची मेजवानी
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी कोणतीही रेडीमेड वा जंक फूड न वापरता घरच्या घरी आणि निसर्गाच्या सानिध्यात मिळणाऱ्या रानभाज्या व पौष्टिक घटकांपासून अप्रतिम व चवदार पदार्थ तयार केले. यामध्ये प्रामुख्याने तांदूळ व ज्वारीच्या पिठाचा पौष्टिक पिझ्झा, कुळीथाची उसळ, फांजीची भाजी, लाल भोपळ्याचे वडे, ओल्या हळदीची भाजी, शेवगाच्या पानांची भाजी, लाल भोपळ्याच्या पानाची भाजी, काकडीची भाजी यांसारखे आरोग्यवर्धक शाकाहारी पदार्थ विद्यार्थ्यांनी बनवले. विशेष म्हणजे, या आहारात मुरे मासे, सुकट, बोंबील आणि खेकडा यांसारख्या पारंपरिक रेसिपींचाही समावेश करून विद्यार्थ्यांनी सर्वांनाच चकित केले. विद्यार्थ्यांनी खूप आवडीने बनवून आणले.

या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सकस आहाराची खरी सवय जडण्यास मदत झाली. जंक फूडला उत्तम आणि पौष्टिक पर्याय कसा निवडावा, तसेच आपल्या भागात सहज उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचे औषधी आणि आरोग्यदायी महत्त्व काय आहे, याची अत्यंत मोलाची शिकवण या बालवयातच विद्यार्थ्यांना मिळाली.
विद्यार्थ्यांच्या पाककलेचे कौतुक करताना विस्ताराधिकारी श्री. कैलास सांगळे म्हणाले की, “आपण आतापर्यंत फक्त बटाटे आणि वांगी यांचीच भाजी नेहमी खातो; परंतु वेगवेगळ्या रानभाज्यांच्या पानांची व घटकांची अशी चवदार भाजी आज प्रथमच चाखायला मिळाली. हा अतिशय अनोखा अनुभव आहे.”
शालेय पोषण आहार अधीक्षक रूपाली पगार यांनी विद्यार्थ्यांना आरोग्याचे महत्त्व सांगितले की, “केवळ आहार घेणे महत्त्वाचे नाही, तर तो आहार किती पौष्टिक आहे आणि उपलब्ध पदार्थातून आपण तो कसा उत्तम बनवू शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच आहार घेताना विशेषतः ज्या भांड्यात आपण जेवणार आहोत ती भांडी स्वच्छ असावीत, जेवणापूर्वी हात-पाय स्वच्छ धुऊनच जेवायला बसावे,” असे आरोग्याचे व स्वच्छतेचे मोलाचे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनी घेतलेली ही मेहनत, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मान्यवरांच्या उपस्थितीमुळे धोंडबार शाळेची ही ‘पाककृती स्पर्धा’ विद्यार्थ्यांसाठी खऱ्या अर्थाने शिकण्याची, आरोग्याची आणि आनंदाची पर्वणी ठरली. यावेळी जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल मुख्याध्यापक प्रकाश जगताप यांचा सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी नियोजन केले. श्रीमती संगीता महिरे यांनी सुत्रसंचलन केले.

