
निलेश बावा
तालुका प्रतिनिधी अमळनेर
जळगाव : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव येथील निवृत्त अधिकारी प्रा.डॉ.दशरथ साळुंखे लिखित वरील दोन्ही काव्यसंग्रहांचा प्रकाशन सोहळा, दिनांक-०८/१०/२०२६ रोजी शहरातील हॉटेल रिगल पॕलेसमध्ये संपन्न झाला. “गाव-शिवारातल्या कविता” या काव्यसंग्रहातून कवी प्रा.डॉ.दशरथ साळुंखे यांनी साधारणतः ८० व ९० च्या दशकातील लोकजीवन,गावगाडा,तत्कालीन गाव-शिवारातील शेती,माती,पीकपाणी,गरीबी,शेतकऱ्यांचे कष्टमय जीवन,ग्रामीण सण उत्सव,जत्रा,पाऊस पाणी,धरण,ज्येष्ठ नागरिक व देव-देवता यांचे प्रभावी व अप्रतिम सुंदर असे चित्रण रंगवतांना कवी डॉ.साळुंखे यांनी विविध सुंदर प्रतिमांचा,योग्यप्रकारे साहित्य अलंकारांचा जागोजागी यथायोग्य वापर केलेला दिसून येतो.कवीचे संवेदनशील मन आजही “आपली माती आणि आपली माणसे” यांच्यात निरंतर गुंतलेले आहे असे दिसून येते.त्यांना आपल्या गावाबद्दल,तत्कालीन गावकरी,गावाकडील जुने मित्र,गावक-यांचे जीवन यांच्याबद्दल सदैव प्रेम,जिव्हाळा व स्नेहभाव वाटत असतो.या काव्यसंग्रहातून कवी डॉ.साळुंखे यानी अस्सल ग्रामीण जीवनशैली व तेथील चालीरीती,रुढी-परंपरा,या संदर्भातील व्यथा-वेदना आपल्या अर्थपूर्ण शैलीतून मांडलेल्या आहेत.या कविता अत्यंत साध्या,सोप्या सुगम व ग्रामीण पार्श्वभूमीतील असल्यामुळे त्या रसिक वाचकांना मनापासून आवडतील अशा आहेत.
याचवेळी “शब्दधन वाटू जनलोका” या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे सुद्धा प्रकाशन झाले.या काव्यसंग्रहातून महाराष्ट्रातील थोर संत,समाजसुधारक,क्रांतिकारक,शिक्षणतज्ज्ञ,देवदेवता,प्रसिद्ध गायक,अभिनेते,आजूबाजूच्या समाजातील काही नाविन्यपूर्ण कार्य करणारे कर्तृववान व्यक्ती,आणि परिवारातील सदस्य,यांना हा दुसरा काव्यसंग्रह समर्पित केलेला आहे.तसेच इतर सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,नैसर्गिक,ग्रामीण विषय व आशयांवर आधारित सुंदर आशयघन कविता या संग्रहातून अधोरेखित झालेल्या आहेत.दोन्हीही काव्यसंग्रहातील काव्यरचना वेगळ्या,सुगम,प्रासादिक,सहज सुलभ,वाचनीय असून विविध विषय,आशय व वैशिष्ट्यांनी समृद्ध झालेल्या आहेत.
या काव्यसंग्रहांचे प्रकाशन पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत,ज्येष्ठ साहित्यिक,अ.भा.मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ.श्रीपाल सबनीस व सौ.सबनीस यांचे शुभहस्ते संपन्न झाले.या कार्यक्रमाचे अध्यक्ष डाएटचे मा.प्राचार्य,तथा शिक्षणाधिकारी अप्पासाहेब नीळकंठ गायकवाड होते.तर प्रमुख अतिथी म्हणून डाएटचे विद्यमान प्राचार्य डॉ.अनिल झोपे,अहिराणी साहित्यिक प्राचार्य डॉ.बापूराव देसाई,क.ब.चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षणशास्र विद्याशाखेचे अधिष्ठाता,खिरोदा बी.एड्.कॉलेजचे प्रा.डॉ.साहेबराव भूकन,चोपडा येथील प्रसिध्द साहित्यिक व कवी अशोकदादा सोनवणे,धरणगाव येथील प्रसिद्ध कवी डॉ.संजीवकुमार सोनवणे,अथर्व प्रकाशनचे प्रमुख श्री.युवराज माळी उपस्थित होते.याप्रसंगी शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवर,श्री.वाल्मिकराव मराठे,कवयित्री रेखा मराठे,पूनम साळुंखे व इतर साहित्यिक व मान्यवर कवी उपस्थित होते. सूत्रसंचालन डाएटच्या प्रा.डॉ.संगिता महाजन व श्री.महेंद्र साळुंखे सर यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री.सौरभ साळुंखे केले.रसिक वाचकांनी दोन्हीही काव्यसंग्रहांचा अवश्य आस्वाद घ्यावा असे आवाहन कवी प्रा.डॉ.दशरथ साळुंखे यांनी केलेले आहे.

