
नांदगाव | (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघात मतदार यादीचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) सुरू आहे. मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करणे आणि मतदारांना आवश्यक मार्गदर्शन करणे, या उद्देशाने नांदगाव तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर शनिवार, दि. १० ऑक्टोबर आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय, ११३ नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रेस नोटमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.
मतदारांनी घ्यावी विशेष दक्षता
मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत काही मतदारांना नोटीस प्राप्त झाली असल्यास त्यांनी गैरसमज करून घेऊ नये. पात्र मतदारांचे नाव वगळले जाणार नाही, याची दक्षता प्रशासन घेत आहे. बूथस्तरीय अधिकारी (BLO) घरी आल्यास नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे आणि आवश्यक मूळ कागदपत्रे दाखवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे
.मतदारांनी आधार कार्ड, जन्माचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, पासपोर्ट, बँक पासबुक, घरपट्टी पावती किंवा विहित नमुन्यातील अन्य आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत.मतदार यादीतील नाव तपासण्याचे आवाहनमतदारांनी आपले नाव अधिकृत मतदार संकेतस्थळावर तपासावे. ज्या मतदारांना नोटीस प्राप्त झाली आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित BLO कडे किंवा ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा. प्राप्त अर्जांची पडताळणी करून सुनावणीअंती अंतिम निर्णय घेतला जाईल.
नवीन मतदार नोंदणीसाठी नमुना ६, मतदार यादीतील नाव वगळण्यासंदर्भातील अर्जासाठी नमुना ७, तर नाव व तपशिलातील दुरुस्तीसाठी नमुना ८ वापरता येईल.मतदार यादीसंदर्भातील दावे व हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत १२ ऑक्टोबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे पात्र नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.विशेषतः १ ऑक्टोबर २०२६ रोजी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या आणि अद्याप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी विशेष शिबिरात सहभागी होऊन मतदार नोंदणी करून घ्यावी.हे आवाहन सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार सुनील सौदाणे, नांदगाव यांच्या वतीने करण्यात आले आहे.

