
रयत पंढरीचे विठ्ठल पद्मभूषण कर्मवीर डॉ.भाऊराव पाटील उर्फ आण्णा यांना आराध्य दैवत मानून रयत शिक्षण संस्थेमध्ये समर्पित भावनेने काम करणारे तसे अनेक रयतसेवक आहेत त्यापैकी मला सर्वात जास्त भावलेलं एक कर्मपरायण व्यक्तिमत्व म्हणजे रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध शाखांमध्ये आपल्या कर्तृत्वाने आगळीवेगळी ओळख निर्माण करणारे व सध्या मानोरी शाखेत कार्यरत असलेले श्री.पंढरीनाथ गजानन राऊत सर होय.माझे निगडोळ शाखेतील माजी सहकारी पंढरीनाथ राऊत सर यांचा सहकारी म्हणून मला फक्त तीन महिने सहवास लाभला परंतु या तीन महिन्याच्या कालावधीत जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ ठेवून शब्दात माधुर्य,वृत्तीत सहकार्य आणि अध्यापनात औदार्य असा त्रिवेणी संगम असलेलं व्यक्तिमत्व राऊत सर हे शाळेतील कामाचं सुयोग्य व्यवस्थापन,सोपविलेल्या जबाबदारीचे वेळेत निराकरण आणि सहकाऱ्यांना सदैव खांद्याला खांदा लावून मदत करणारे व वेळेत काम पूर्ण कसे करावे हे सर्व रयतसेवकांना आपल्या कृतीतून व न बोलता शिकविणारे अष्टपैलू शिक्षक आहेत.मुख्याध्यापक म्हणून त्यांच्यासोबत काम करतांना ३५ विभाग त्यांच्याकडे असून सुद्धा त्यांच्या कामाचा आवाका मला थक्क करणारा व निश्चितच अभिमानास्पद वाटला."कल करे सो आज कर..आज करे सो अब कर" हे विधान राऊत सरांच्या देहबोलीतून मी निगडोळ शाखेत अनुभवले.एक गोष्ट त्यांच्या बाबतीत कौतुकाने सांगावीशी वाटते ती म्हणजे त्यांना मी सोपविलेली कोणतीही जबाबदारी त्यांनी कधीच नाकारली नाही.कामचुकारपणा,दुटप्पी भूमिका,कामास टाळाटाळ,सूडबुद्धी,मी पणा,आपले काम दुसऱ्यावर ढकलण्याची त्यांना कधीच सवय नाही.हे काम माझे नाही तर मुख्याध्यापकांचे आहे असे त्यांना उर्मटपणे किंवा उद्धटपणे बोलताना मी कधीच पाहिले नाही.फक्त आपले काम करणे इतरांच्या कामाशी आपल्याला काही घेणे देणे नाही अशी स्वार्थी प्रवृत्ती न ठेवता ही शाळा माझी आहे आणि शाळेतील काम हे आपले सर्वांचे आहे हा केंद्रबिंदू मनाशी बाळगून त्यांनी इमानेइतबारे स्वतःला कर्तव्याच्या प्रती वाहून घेतले.मनात अहंकाराचा उकिरडा न बाळगता सदैव संस्काराच्या शब्दफुलांचा सडा विद्यार्थ्यांत व आपल्या सहकाऱ्यांत विखुरणारे अजातशत्रू व्यक्तिमत्व राऊत सर हे त्यांच्या या सुस्वभावामुळे रयत परिवारात सुंगधित आहेत.त्यांची निगडोळ शाखेतून बदली झाल्यावर जणू माझा उजवा हातच गेला याची तीव्र अनुभूती मला त्यावेळी जाणवली.परंतु जाण्यापूर्वी त्यांनी शाळेचे SQAAF चे काम पूर्ण केले.पोषण आहाराचे रेकॉर्ड अत्यंत आदर्शरित्या अद्ययावत करून गेले.निगडोळ शाखेला मुख्यमंत्री माझी शाळा..सुंदर शाळा हा तालुकास्तरीय पुरस्कार मिळाला.परंतु खऱ्या अर्थाने त्या पुरस्काराचा पाया असणारे पंढरीनाथ राऊत सर हे ज्यावेळी मी मा.अन्न व औषधी प्रशासन राज्यमंत्री श्री.नरहरी झिरवाळ साहेब यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारत होतो त्यावेळी ते नव्हते.त्यांची तेव्हा खूप उणीव भासली.राऊत सरांसारखे निस्वार्थी रयत सेवक लाभणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे.ज्या ज्या शाखेला ते लाभले ते त्या शाखेचे परभाग्य आहे असे मी मानतो.म्हणून मला म्हणावेसे वाटते..
"जिथे जिथे तू जाशील
हे माझ्या पंढरीनाथा
तिथे तिथे लिहशील
तू नित्य यशाची गाथा"
पंढरीनाथ राऊत सर म्हणजे चांगल्या कामाबद्दल ज्येष्ठांना वंदन करणारं आणि कनिष्ठांचं अभिनंदन करणारं व्यक्तिमत्व होय..सूर्यासारखं दाहक न होता चंद्रासारखं मोहक होऊन सर्वांना मोहून टाकणारं शितल व्यक्तिमत्व होय.मी जरी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आहे तरी राऊत सरांसारखा कष्टाळू,निष्कलंक,प्रेमळ,निर्मळ,निर्गवी,निस्वार्थी व कर्मपरायण स्नेही आयुष्यभर कधीही विसरू शकत नाही.
मित्रवर्य,प्रिय रयत बंधू पंढरीनाथ राऊत सर तुम्हाला जन्मदिवसाच्या आभाळभर हार्दिक शुभेच्छा व अनेकोत्तम शुभाशीर्वाद..या मंगलदिनी मी विश्वेश्वराला प्रार्थना करतो की,
हे ईश्वरा..माझ्या पंढरीनाथाचा यशाचा वेलू गगनाला भिडू दे.. त्याच्या आयुष्याच्या अंगणात नित्य सुखाचं चांदणं पडू दे..
श्री.देवदत्त बोरसे
(मुख्याध्यापक)
मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय निगडोळ ता.दिंडोरी जि.नाशिक

