
सेलू 🙁 प्रतिनिधी ) बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूल, सेलू येथील मुलींच्या बॅडमिंटन संघाने जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर संघाची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मुलींच्या संघाने स्पर्धेत उत्कृष्ट खेळ, सांघिक समन्वय, जिद्द आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. नियमित सराव, मेहनत आणि खेळाप्रती असलेली निष्ठा यांमुळे संघाला हे उल्लेखनीय यश मिळाले.
शाळेच्या मुख्याध्यापिका रितू श्रीवास्तव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच बॅडमिंटन प्रशिक्षक सिद्धेश्वर भैरट सर यांच्या प्रशिक्षणामुळे विद्यार्थिनींना ही यशस्वी कामगिरी करता आली.
या यशाबद्दल शाळेच्या अध्यक्ष भावनाताई बोर्डीकर (मुंगसे) यांनी मुलींच्या संघाचे अभिनंदन केले आणि विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच मुख्याध्यापिका, प्रशिक्षक आणि शिक्षकवृंद यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
बोर्डीकर्स पोदार लर्न स्कूलच्या मुलींच्या संघाने मिळविलेल्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. विभागीय स्तरावरही संघ उत्तम कामगिरी करून शाळेचा गौरव वाढवेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

