
नांदगाव 🙁 प्रतिनिधी )
मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल, नांदगाव विद्यालयात ‘हरित सेना’ समितीच्या वतीने वन्यजीव सप्ताहाचे आयोजन अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती काळे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हरित सेना समिती प्रमुख श्री. गजेंद्र माताडे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी प्रास्ताविकामधून वन्यजीव सप्ताहाचे महत्त्व सांगून हरित सेनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
याप्रसंगी व्यासपीठावर मुख्याध्यापिका ज्योती काळे, वनविभाग नांदगावचे नियतक्षेत्र अधिकारी संतोष शिंदे, मनोज मोरे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी “वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा” आणि “निसर्ग आहे जीवनाचा आधार, वन्यजीव त्याचा अनमोल शृंगार” अशा पर्यावरणपूरक व जनजागृतीपर घोषणा देऊन परिसर दुमदुमून टाकला.
मार्गदर्शन करताना वनविभागाचे नियतक्षेत्र अधिकारी संतोष शिंदे यांनी वन्यजीव सप्ताह साजरा करण्यामागचा मुख्य उद्देश विशद केला. तसेच मानवी जीवनातील पर्यावरणाचे स्थान आणि वन्यजीवांचे संरक्षण का गरजेचे आहे, यावर विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी, पृथ्वीवरील पर्यावरणाचा व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक घटकाने वन्यजीवांचे जतन व रक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख रवी कवडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर पगार यांनी मानले.
या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

