
नाशिक: दि.१५ (प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक संस्थेचे जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन आणि भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक श्री ढेपले बी के जेष्ठ शिक्षक श्री सावंत बी एस यांच्यासह शिक्षकवृंद व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमा पूजनाने व त्यांच्या जीवन प्रेरक विचारांच्या सादरीकरणाने करण्यात आली. प्रास्ताविकात श्री सावंत बी एस यांनी डॉ.कलाम यांच्या ‘वाचन संस्कृती’वरील विचारांचे महत्त्व सांगत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, डॉ. कलाम यांनी नेहमीच विद्यार्थ्यांना नेहमी मोठी स्वप्ने पहा, मेहनत करा आणि वाचन करा हा संदेश दिला. वाचन हीच माणसाच्या विचारशक्तीला धार लावणारी किल्ली आहे. आजच्या डिजिटल युगात पुस्तकांचा सुगंध आणि ज्ञानाचा ठेवा टिकवून ठेवणे आपली जबाबदारी आहे. शिक्षक मनोगत व्यक्त करतांना श्री भामरे पी एस यांनी जीवन कार्याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक श्री.ढेपले बी के यांनी वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विविध उदाहरणे देऊन प्रेरणादायी शब्दांत विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, डॉ.कलाम हे केवळ शास्त्रज्ञ नव्हते, तर ते तरुण भारताचे मार्गदर्शक दीपस्तंभ होते. त्यांच्या जीवनातून प्रत्येक विद्यार्थ्याने मेहनत, प्रामाणिकपणा आणि स्वप्नपूर्तीसाठी झटण्याचा धडा घ्यावा. वाचनातून विचार निर्माण होतात, विचारांमधून कृती आणि कृतीतून यश जन्माला येते. वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी शालेय पाठ्यपुस्तक, संविधान, अग्नीपंख, छावा, मृत्युंजय, विज्ञान कथा, आई, शामची आई, गावाकडील गोष्टी, ‘सूर्याची सावली’ अमरवेल, ईश्वर, पुस्तकातील पान, अशा विविध प्रेरणादायी पुस्तकांचे वाचन केले. तसेच हात धुणे दिनानिमित्त विद्यालयाचे विज्ञानशिक्षक श्री भामरे पी एस यांनी हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले व विद्यार्थींना मार्गदर्शन केले. त्यांच्या कडून प्रात्यक्षिक करून घेतले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदाने उत्स्फूर्त सहकार्य केले. सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन श्री सावंत बी एस यांनी केले.

