
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगावच्या ‘मराठी विभाग’, ‘ग्रंथालय विभाग’ व ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची ९५ वी जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचा प्रारंभी मान्यवरांच्या शुभहस्ते विद्यादायिनी सरस्वती माता व डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले.

‘वाचन प्रेरणा दिना’च्या प्रित्यर्थ आयोजित व्याख्यानाच्या माध्यमातून व्याख्याते प्रा.डॉ. राजेश झनकर यांनी आपल्या व्याख्यानातून विद्यार्थ्यांना साहित्याचे विविध प्रकार सविस्तर समजावून सांगितले. वाचनामुळे व्यक्तीला होणाऱ्या फायद्यांचीही आपल्या मनोगतातून माहिती दिली. डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना त्यांनी ‘अग्निपंख’, इग्नाटेड माईंड्स’ या डॉक्टर कलामांच्या पुस्तकांच्या लेखनातील मतितार्थ सांगितला. विद्यार्थ्यांनी आपल्या भावी जीवनात यशस्वी व सुसंस्कृत होण्यासाठी तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी वाचनाला अग्रक्रम द्यावा असे याप्रसंगी आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन करताना दृकश्राव्य साधनांमधून आपल्याला मिळालेली माहिती दीर्घकाळ आपल्या स्मरणात न राहता कालांतराने आपण विसरतो परंतु वाचन केलेली माहिती आपल्या दीर्घकाळ स्मरणात राहते कारण एकाग्रतेमुळे आपल्या मन:पटलावर त्या स्मृती कायमस्वरूपी जतन असतात म्हणून वाचनाच्या नियमित सवयीमुळे व्यक्ती प्रगल्भ व बहुश्रुत होत असल्याचे सांगितले. वाचनाने मुळ लेखकाच्या अनुभवांशी तादात्म्य पावल्याने व्यक्ती अधिक उन्नत, विशाल व अनुभव संपन्न होत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता वाचन संस्कृती जोपासण्यासाठी कटिबद्ध राहण्याचे आवाहन याप्रसंगी केले.
कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी विषयाचे प्रा.एस.जी.पवार यांनी वाचनामुळे आपल्या जीवनाला कलाटणी मिळाल्याचे सांगितले.फावल्या वेळेमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तक-ग्रंथ वाचण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. त्यांनी याप्रसंगी वामनदादा कर्डक यांची गाजलेली कविता सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी ग्रंथालय विभागाने आयोजित केलेल्या ग्रंथ प्रदर्शनाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनातील पुस्तकांचे वाचन केले.
सदर कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रा.योगेश वाघ यांनी भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली व वाचन प्रेरणा दिनाचे महत्त्व विशद केले.
सदर प्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे, महाविद्यालयाच्या IQAC चे समन्वयक डॉ.एम.बी.आटोळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख जी.व्ही.बोरसे, प्रा.अजय पानसरे, प्रा.रंजीत पवार, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. बी.एम.आहेर, प्रा.आर.डी.पाटील,प्रा. महाले, प्रा.श्रीमती आहिरे, प्रा.श्रीमती लोखंडे, प्रा.श्रीमती डेरे, प्रा.शिंदे, प्रा.श्रीमती अन्सारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.जी.व्ही.बोरसे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तरचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी. पैठणकर, ग्रंथालय विभागाच्या पाटील मॅडम व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमासाठी उपस्थित स्वयंसेवक व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तरच्यावतीने अल्पोपहार देण्यात आला.

