
लासलगाव, १५ ऑक्टोबर:
नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे, प्रा. किशोर गोसावी व प्रा. उज्वल शेलार इ. उपस्थित होते. आपल्या मनोगतात उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे आणि प्रा. किशोर गोसावी यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना नियमित वाचनाची सवय लावण्याचे आवाहन केले.
‘श्यामची आई’ पुस्तकाचे वाटप आणि संस्कार परीक्षा
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विशेष उपक्रम राबवत साने गुरुजी लिखित ‘श्यामची आई’ या प्रेरणादायी पुस्तकाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. तसेच, महाविद्यालयात दरवर्षीप्रमाणे घेतल्या जाणाऱ्या ‘साने गुरुजी कथामाला संस्कार परीक्षे’त ३२० विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रा. उज्वल शेलार यांनी विशेष परिश्रम घेतले.
अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी आजच्या डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांना वाचनातून समृद्ध होण्याचा मोलाचा संदेश दिला.

या कार्यक्रमास रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा. देवेंद्र भांडे, प्रा. महेश होळकर, प्रा. जयश्री पाटील, प्रा. दत्तात्रय गायकवाड, प्रा. रामसिंग वळवी यांच्यासह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रामनाथ कदम यांनी तर प्रास्ताविक प्रा. उज्वल शेलार यांनी केले आणि आभार प्रा. जयश्री पाटील यांनी मानले. संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन या उपक्रमास लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रा.से.यो. विभाग आणि सर्व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले.

