
‘बहुजन मुक्ती आंदोलन’चे प्रदेशाध्यक्ष प्रविण जगताप यांचा सरकारवर घणाघात; व्हीआयपी संस्कृतीवर प्रश्नचिन्ह
नाशिक: (प्रतिनिधी)
“महिन्याला अवघे १५,००० रुपये कमवणारा एक सामान्य माणूस प्रामाणिकपणे प्रत्येक नाक्यावर टोल भरतो. पण लाखो रुपयांचे वेतन आणि भत्ते घेणारे मंत्री आणि लोकप्रतिनिधी मात्र टोल फ्री प्रवास करतात! टॅक्स भरणारा सामान्य माणूस नेहमीच अडचणीत आणि फुकट प्रवास करणारे मात्र मजेत. हा कसला न्याय? ही व्हीआयपी संस्कृती कधी संपणार?”, असा थेट आणि संतप्त सवाल बहुजन मुक्ती आंदोलन राष्ट्रीय संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रविण जगताप यांनी सोशल मीडियाद्वारे उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानामुळे आता टोलमाफी आणि व्हीआयपी सवलतींवरून पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
करांचा बोजा सामान्य माणसावरच का?
सध्या देशभरात आणि राज्यात टोल दरवाढीवरून सर्वसामान्य नागरिकांमध्ये तीव्र असंतोष आहे. या पार्श्वभूमीवर प्रविण जगताप यांनी राज्यातील व्हीआयपी संस्कृतीवर (VIP Culture) जोरदार टीका केली आहे. रस्ते आणि महामार्गांच्या निर्मितीसाठी जनतेच्याच विविध करांमधून निधी उभा केला जातो. असे असतानाही, केवळ सर्वसामान्य नागरिकालाच प्रत्येक टोल नाक्यावर थांबवून पैसे वसूल केले जातात, तर दुसरीकडे लाखो रुपयांचे वेतन घेणाऱ्या लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना शासकीय सवलतीच्या नावाखाली मोफत प्रवासाची मुभा दिली जाते, या तफावतीकडे जगताप यांनी लक्ष वेधले आहे.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
प्रविण जगताप यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकशाहीत जनता हीच खरी मालक असताना, जनतेला सोयी-सुविधांसाठी खिसा रिकामा करावा लागतो आणि लोकसेवकांना मात्र सर्व सवलती मोफत मिळतात, ही विषमता कधी संपणार? असा सूर नाशिककरांमधूनही उमटत आहे. यावर आता सरकार काही ठोस पावले उचलणार की सर्वसामान्यांची ही लूट अशीच सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

