
नांदगाव, (प्रतिनिधी):
आषाढी एकादशीचे औचित्य साधत नांदगाव येथील सौ. क. मा. कासलीवाल विद्यालयात भक्तिमय वातावरणात “विठ्ठल नामाची शाळा” भरली. वारकरी वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा अखंड गजर करत संपूर्ण शालेय परिसर भक्तिरसाने भारावून टाकला.

संत ज्ञानेश्वर, संत नामदेव आणि संत तुकाराम यांच्या अभंगांच्या स्वरांनी वातावरण प्रसन्न झाले. विद्यार्थ्यांनी टाळ-मृदुंगाच्या गजरात विठ्ठलाचे नामस्मरण करत वारकरी परंपरेचा सुंदर अनुभव साकारला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ , विशाल सावंत व प्रिन्सिपल मनी चावला यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. विठ्ठल नामाचा जयघोष करत बाल वारकऱ्यांची दिंडी सावता मंदिरात दाखल झाली. तेथे विद्यार्थ्यांनी अभंग गायन, समूह नृत्य, गोल रिंगण, फुगडी, वारकरी पाऊली आदी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या भक्तिमय सोहळ्यात विद्यार्थ्यांचा उत्साह आणि सहभाग विशेष लक्षवेधी ठरला.
यानंतर बाल वारकऱ्यांची दिंडी शहरातील प्रमुख चौकातून मार्गक्रमण करत पुन्हा विद्यालयात परतली. संपूर्ण परिसर विठ्ठलमय झाल्याने उपस्थितांनी या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले.

याप्रसंगी संस्थेचे चेअरमन मा. सुनीलकुमारजी कासलीवाल ,तसेच उपाध्यक्ष सुशील कासलीवाल, सचिव विजय चोपडा,सहसचिव प्रमिलाताई कासलीवाल,विश्वस्त रिखबचंद कासलीवाल,जुगलकिशोर अग्रवाल, महेंद्र चांदिवाल, आनंद कासलीवाल, प्रिन्सिपल मनी चावला विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ,विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा देत त्यांच्या उत्स्फूर्त सहभागा बद्दल अभिनंदन केले.

