
नाशिक (प्रतिनिधी) शुक्रवार रोजी स्वामी विवेकानंद सोसायटी संचलित, श्रीमान टी. जे. चौहान (बिटको) माध्यमिक विद्यालय, नाशिक येथे वृक्षसंवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांची भव्य वृक्षदिंडी मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी सीड्स बॉलचे वाटप करून “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविला. विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या आकर्षक पोस्टर्स व घोषवाक्यांच्या माध्यमातून वृक्षसंवर्धनाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

दिंडीदरम्यान विद्यार्थ्यांनी “विठ्ठल… विठ्ठल…” नामाचा अखंड गजर करत परिसर भक्तिमय केला. सुंदर सजविलेली पालखी हे दिंडीचे मुख्य आकर्षण ठरले. पर्यावरण संरक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला.
हा उपक्रम मुख्याध्यापक सौ. माळी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पर्यवेक्षक श्री. डी. बी. अहिरे सर यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या पर्यावरणप्रेमाचे व सामाजिक बांधिलकीचे मनापासून कौतुक करत वृक्षलागवड व वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला.

