
निगडोळ:-येथील रयत शिक्षण संस्थेच्या मा.शरदरावजी पवार माध्य.विद्यालय,निगडोळ,ता.दिंडोरी,जि.नाशिक या ज्ञानसंकुलात मा.मुख्याध्यापक श्री.बोरसे डी.डी. यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व ग्रंथदिंडीचे आयोजन जेष्ठ शिक्षक श्री.कापडणीस एन.जे.व श्री.बेद्रे एस. व्ही.यांनी केले.
कार्यक्रमाची सुरुवात मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते श्री.विठ्ठल-रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात,अभंग म्हटले.हरिपाठ व विठ्ठल नामाच्या जयघोषात शाळा परिसरातून दिंडी काढली.”ज्ञानोबा-तुकाराम”, “पुंडलिक वरदे हरी विठ्ठल”अशा घोषणांनी परिसर भक्तिमय झाला.
ग्रंथदिंडीद्वारे विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचे महत्त्व पटवून देण्यात आले,तर वृक्षदिंडीच्या माध्यमातून पर्यावरण धसंवर्धनाचा संदेश देण्यात आला.विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन आणि स्वच्छतेविषयी जनजागृती करणाऱ्या घोषणा दिल्या.
यावेळी मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.कार्यक्रमाच्या शेवटी मा.मुख्याध्यापकांनी आषाढी एकादशीचे धार्मिक,सांस्कृतिक व सामाजिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले..
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती,संस्कार,पर्यावरणप्रेम आणि वाचनाची आवड जोपासण्यास निश्चितच प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती.पी.व्ही.गायकवाड,श्री.व्ही.ए.देवरे व श्री.टी.व्ही.भामरे यांनी अनमोल सहकार्य केले.

