
नाशिक:- ( प्रतिनिधी ) सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने चराचरासह मनामनातही ओलावा निर्माण झाला आहे. बळीराजासह सर्व प्राणिमात्र तृप्त झाले आहेत. अशावेळी आपल्या वाढदिवशी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेले विनायक झाडे यांनी आपल्या वाढदिवशी दातृत्वाचा ओलावा जपत शैक्षणिक साहित्य प्रदान करत गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले आहे.

पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि मुंबई पोलीस विनायक झाडे यांनी मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसमवेत वाढदिवस साजरा करण्याबरोबरच आपण ज्या शाळेमध्ये शिकलो, ज्या शाळेतील गुरुजनांचे संस्कार घेऊन आपण पुढील वाटचाल केली, त्या विद्यालयाप्रती कृतज्ञता व्यक्त करत नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या चार वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमाला सहकार्य केले.
वाढदिवसाच्या निमित्ताने विनायक झाडे यांच्यासह अथर्व गाढवे, सिद्धी झाडे यांनी दहा स्कूलबॅग, वह्या आणि गणित साहित्य गरजू विद्यार्थ्यांना सप्रेम भेट देत वाढदिवस साजरा केला. यावेळी विनायक झाडे यांच्या वाढदिवसानिमित्त फळांचा अनोखा केक कापण्यात आला आणि त्यांच्या भावी वाटचालीला शाळेच्या वतीने मुख्याध्यापक अरुण पगार, सर्व शिक्षक-कर्मचारीवृंद आणि विद्यार्थी यांनी शुभेच्छा दिल्या. श्री.झाडे यांनी विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त चॉकलेटचे वाटप केले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.

