
नांदगाव :(प्रतिनिधी )म. वि. प्र . समाजाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागामार्फत दि. २९ जुलै २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एन. यू. पाटील उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात त्यांनी विद्यार्थ्यांनी निसर्ग, वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाबाबत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून जैवविविधतेच्या संरक्षणासाठी सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले. तसेच अशा जनजागृतीपर उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राणिशास्त्र विभागप्रमुख श्री. एम. बी. अटोळे यांनी प्रास्ताविकातून आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनाचे महत्त्व व व्याघ्र संवर्धनाची आवश्यकता विशद केली. प्रमुख अतिथी म्हणून नांदगाव वनविभागाचे वन अधिकारी श्री. अण्णा टेकनर तसेच श्री. संजय बेडकर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना वाघांचे पर्यावरणीय महत्त्व, जैवविविधतेतील त्यांचे स्थान, व्याघ्र संवर्धनाची गरज, तसेच वाघ व बिबट्या यांतील फरक याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे मानवी वस्त्यांमध्ये होणारा वावर, मानव–बिबट्या संघर्षाची कारणे, बिबट्यांच्या हल्ल्यांपासून घ्यावयाची खबरदारी आणि वन्यजीवांबाबत समाजात जनजागृती होण्याची आवश्यकता यावरही त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी वन्यजीव संरक्षणात सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. ए. मराठे, कनिष्ठ महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी श्री. बी. के. पवार, सौ. पी. एस. कडलग, प्रयोगशाळा सहाय्यक श्री. सागर वडकते, तसेच शिपाई श्री. थोरात यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पी. एन. जाधव यांनी केले, तर श्री. ए. एम. लव्हाटे यांनी उपस्थितांचे आभार मानले. या जनजागृतीपर उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्याघ्र संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली.

