
नांदगाव ( प्रतिनिधी) म.वि.प्र.समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,नांदगाव येथे कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना+2’ स्तरच्यावतीने ‘गुरूपौर्णिमा’ व ‘जागतिक व्याघ्र दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या गीतमंचच्या विद्यार्थिनी अश्विनी टिळेकर, काजल टिळेकर व कीर्ती देवकर यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. विद्यार्थ्यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त उपस्थित मान्यवर व गुरुजनांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी ह्या शैक्षणिक वर्षात इ.11वीतील प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत केले. गुरूपौर्णिमेचे महत्व विशद करुन पर्यावरणातील अन्नसाखळी टिकविण्यासाठी वन्यजीव संवर्धन करणे आवश्यक असल्याने समाजात ‘व्याघ्र दिनाच्या’ निमित्ताने जनजागृती करण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन केले. ‘एक पेड माॅं के नाम’ या उपक्रमात यशस्वी रित्या सहभाग घेण्याचे या प्रसंगी आवाहन केले.

सदर प्रसंगी ह.भ.प.संतोष महाराज नरोडे यांनी गुरुपौर्णिमेच्या प्रित्यर्थ विद्यार्थ्यांना विविध उदाहरणातून बहुमूल्य मार्गदर्शन केले.
गौरी सोनवणे, काजल टिळेकर, श्रद्धा पगारे या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांमध्ये गुरुजनांविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केली. सदर प्रसंगी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम.राठोड,कनिष्ठ महाविद्यालयाचे कला व वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्रा.जी.व्ही.बोरसे, प्रा.एस.जी पवार, प्रा.ए.के.जाधव उपस्थित होते. मान्यवरांच्या स्वागतासाठी कोमल गायकवाड, पूजा गोसावी, ईश्वरी पवार, श्रद्धा पगारे,प्राजक्ता गोसावी या विद्यार्थिनींनी सुबक रांगोळीचे आरेखन केल्याने त्यांचाही याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एम. राठोड यांनी दोन्ही कार्यक्रमांची रूपरेषा व महत्त्व विशद केले. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे कार्यक्रम अधिकारी प्रा.बी.के.पवार यांनी केले. आभार प्रदर्शन प्रा.आर.डी.पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तरचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.एस.सी.पैठणकर, लोखंडे मॅडम,अन्सारी मॅडम,आहेर मॅडम व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

