
गुरुपौर्णिमा उत्सत साजरी
नांदगाव(प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत गुरुपौर्णिमेचा पवित्र सण अत्यंत उत्साहपूर्ण, भक्तिमय व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृतीत गुरुंना देवापेक्षाही श्रेष्ठ स्थान असून ज्ञानदानाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे जीवन घडविणाऱ्या गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन, व्यासपूजन व दीपप्रज्वलन शालेय प्राचार्या श्रीमती पूनम डी. मढे व शरयू आहेर, अनुराधा खांडेकर, सोनाली खैरणार यांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शाळेच्या परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी गुरुंच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे आशीर्वाद घेतले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः” या मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते.यावेळी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, गुरु-शिष्य परंपरा, भारतीय संस्कृतीतील गुरुंचे स्थान तसेच शिक्षकांचे समाजातील योगदान याविषयी प्रभावी भाषणे सादर केली. काही विद्यार्थ्यांनी गुरुंवरील कविता, गीत, आणि मनोगते सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून गुरुंबद्दलचा आदर, प्रेम व कृतज्ञता स्पष्टपणे दिसून आली.
कार्यक्रमात शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना पुष्पगुच्छ, शुभेच्छापत्रे व भेटवस्तू देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये, संस्कार, शिस्त, प्रामाणिकपणा आणि ज्ञानाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
शालेय प्राचार्या आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, “गुरु हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत. ज्ञान, संस्कार आणि चारित्र्य निर्माण करण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतात. विद्यार्थ्यांनी गुरुंचा आदर ठेवून त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत जीवनात यशस्वी व्हावे.” विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गुरु वंदना सादरीकरणांना उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिला. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनातील शिक्षकांच्या योगदानाबद्दल अनुभव कथन केले. यामुळे कार्यक्रम अधिक भावनिक व प्रेरणादायी ठरला.
कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये गुरुंबद्दल आदर, शिस्त, संस्कार आणि शिक्षणाविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण झाला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शालेय शिक्षिका सिद्धी देशपांडे व पायल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शरयू आहेर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. गुरुपौर्णिमेचा हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला असून उपस्थितांनी त्याचे भरभरून कौतुक केले.


