
मूळडोंगरी, ता. नांदगाव (प्रतिनिधी): सरस्वती माध्यमिक विद्यालय, मूळडोंगरी येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व्यासपीठावर भगवान वेदव्यास, माता सरस्वती व गुरुजनांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी गुरूंच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित करणारी भाषणे, कविता, सुविचार आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पुष्पगुच्छ व शुभेच्छापत्रे अर्पण केली.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी गुरूंचे जीवनातील स्थान स्पष्ट करून विद्यार्थ्यांनी ज्ञान, शिस्त आणि संस्कार यांचा स्वीकार करावा, असे मार्गदर्शन केले. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिक्षण घेऊन आदर्श नागरिक बनण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनी केले, तर उपस्थित शिक्षक, शिक्षिका,व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.

