
नांदगाव -( प्रतिनिधी )दिनांक 29 जुलै 2026
नांदगाव येथील सौ. क. मा. कासलीवाल माध्यमिक विद्यालयात भारतीय संस्कृतीतील अत्यंत पवित्र आणि प्रेरणादायी असा ‘गुरुपौर्णिमा’ (व्यास पौर्णिमा) सोहळा अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात पार पडला.या विशेष कार्यक्रमाची सुरुवात भारतीय संस्कृतीचे शिल्पकार महर्षी व्यास यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवर व शिक्षकांनी महर्षी व्यासांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
विद्यार्थ्यांकडून गुरुवंदना व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
‘गुरु आणि शिष्य’ यांच्यातील पवित्र नात्याची साक्ष देणारा हा सोहळा अत्यंत भावनिक ठरला. विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतांतून गुरुंविषयीची अपार श्रद्धा आणि कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, विद्यालयातील सर्व शिक्षकवृंदाचा विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ आणि आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मान केला व त्यांचे आशीर्वाद घेतले.

कार्यक्रमादरम्यान विद्यालयातील शिक्षक विजय गायकवाड यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी “विद्यार्थ्यांनी आपल्या भावी आयुष्यात कसे वागावे, नैतिक मूल्ये कशी जोपासावीत आणि संकटांवर मात करत यशाचे शिखर कसे गाठायचे,” याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक गोरख डफाळ यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षकांबरोबरच आईवडिलांच्या आज्ञेचे पालन करावे कारण आईवडील प्रथम गुरु असतात असे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर भारतीय परंपरेतील गुरुशिष्य नात्याचे महत्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.
याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गोरख डफाळ, विशाल सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी दळवी व आकाश साळवे यांनी तर युग खैरनार याने आभार व्यक्त केले.

