
नाशिक (प्रतिनिधी) नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू भूमिका नेहेते हीची अमेरिका (यु.एस.ए.) येथे आयोजित २० वर्षे आतील गटाच्या स्पर्धेसाठी भारताच्या संघाध्ये निवड झाली आहे. ही प्रतिष्ठेची स्पर्धा ५ ते ९ ऑगस्ट, २०२६ दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी भूमिका अमेरिका येथे रवाना झाली आहे. ऍथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया घोषित केलेल्या भारताच्या संघामध्ये भूमिकाने आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या आधारे भारताच्या संघामध्ये आपले स्थान पक्के केले आहे. या स्पर्धेच्या पूर्व तयारीसाठी भारतीय संघ आठ दिवस आधी अमेरिका येथे सराव करणार आहे. जेणेकरून तेथील वातावरणाशी त्यांना जुळवून घेता येईल. या स्पर्धेमध्ये भूमिका ४ x ४००मीटर रिले आणि ४ x ४०० मीटर मिक्स रिले या दोन क्रीडा प्रकारामध्ये सहभागी होणार आहे.

याआधी हॉंगकॉंग येथे २६ ते ३० मे, २०२६ दरम्यान पार पडलेल्या २० वर्षे वयोगटाच्या आशियायी स्पर्धेत भुमिकाने ४ x ४०० मीटर रिले स्पर्धेत उत्तम कामगिरी करून सुवर्ण पदक पटकावले होते. आतापर्यंत भूमिकाने तीन वेळा भारताचे प्रतिनिधित्व केले असून भारताला तीन पदके मिळवून दिलेली आहेत. तर राष्ट्रीय स्पर्धा, खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धां मध्ये एकूण अठरा पदकांची कमाई केली आहे. भूमिका नेहेते या सुवर्ण कन्येने आपल्या वेगवान धावण्याच्या प्रकारामुळे पंचवटी एक्सप्रेस म्हणून आपली नवी ओळख निर्माण केलेली आहे. भूमिका गेल्या सहा वर्षांपासून राष्ट्रीय एन. आय. एस. प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ शास्त्रशुद्ध आणि कठोर मार्गदर्शनाखाली विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी हिरवाडी येथे नियमित सराव करत आहे.

भूमिका या प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही भारतासाठी उत्तम कामगिरी करेल असा विश्वास सिद्ध्यर्थ वाघ यांनी व्यक्त केला.
भूमिकाला या स्पर्धेसाठी नाशिक जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष हेमंत पांडे, सचिव सुनील तावरगिरी, विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यालय, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, आणि सर्व सहकारी यांनी अभिनंदन करून या जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. मैदानी स्पर्धांमध्ये नाशिकच्या खेळाडूंनी याआधी ५००० मीटर, १०,००० मीटर, क्रॉस कंट्री, मॅरेथॉन अश्या लांब पल्याच्या शर्यतीत चांगली कामगिरी केलेली आहे. परंतु भूमिकाच्या माध्यमातून नाशिकचे खेळाडू १००, २०० मीटर , ४०० मीटर, रिले, अडथळ्याची शर्यत अश्या जलद धावण्याच्या शर्यतीतही उत्तम कामगिरी करत आहे हे सिद्ध झाले आहे. भूमिका नेहेते बरोबरच नुकत्याच चीन येथे ९ ते १२ जुलै, २०२६ दरम्यान पार पडलेल्या २३ वर्षे गटाच्या आशियायी स्पर्धेत नाशिकच्या श्रावणी सांगळे हीने भारताचे प्रतिनिधीत्व करतांना दोन सुवर्ण पदके आणि ब्राँझ पदक मिळविले आहे. त्यामुळे पुढील आशियाई स्पर्धां, जागतिक स्पर्धा आणि थेट ऑलीम्पिक मध्येही नाशिकचे खेळाडू भारताच्या संघामध्ये असतील असा विश्वास प्रशिक्षक सिद्धार्थ वाघ यांनी व्यक्त केला आहे.

