नाशिकरोड(प्रतिनिधी):- परिसरातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय पवार आणि संतोष घोडे या दानशुरांनी दातृत्वाचा ओलावा जपला आणि दहा विद्यार्थिनींना शालेय बुटांचे वाटप करत त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवले.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या 'दातृत्वाचा ज्ञानयज्ञ' उपक्रमाला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांसह पालक-ग्रामस्थ आणि परिसरातील विविध क्षेत्रातील दानशूर यांचे सहकार्य लाभले आहे.
ज्येष्ठ पत्रकार सुधाकर गोडसे, मुख्याध्यापक अरुण पगार, एनडीएसटी ॲण्ड एनटी सोसायटीचे उपाध्यक्ष संग्राम करंजकर, शिक्षक-कर्मचारीवृंद यांच्या हस्ते संजय पवार आणि संतोष घोडे यांनी दिलेले दहा शालेय बूट विद्यार्थिनींना प्रदान करण्यात आले. सुधाकर गोडसे आणि मुख्याध्यापक अरुण पगार यांनी दातृत्वाचा ज्ञानयज्ञ उपक्रमात सहभागी झालेल्या सर्व दानशुरांचे आभार मानले. शिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन केले.