
मालेगाव (प्रतिनिधी)- परम पूज्य जिनप्रीतिजी महाराज यांच्या १०० व्या जन्मदिनाच्या पावन प्रसंगी श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघ, मालेगाव कॅम्प येथे एका अत्यंत गरिमामय ‘शाब्दिक सोहळ्याचे’ आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी पूज्य जिनप्रीति जी महाराज यांच्या जीवनाचे व त्यांच्या उपकारांचे स्मरण करत भावपूर्ण विचार व्यक्त करण्यात आले.
शशिकांत कर्नावट यांनी पूज्य जिनप्रीति जी महाराज साहेब यांच्या पावन आठवणींना व संस्मरणांना उजाळा देत त्यांच्याप्रती आपली अथांग श्रद्धा व्यक्त केली. विकासचंद सुराणा यांनीही पूज्य जिनप्रीति जी महाराज साहेब यांच्या जीवनप्रसंग आठवून त्यांना नमन केले.
परम पूज्य सुशीला महाराज (आदी ठाणा) यांनी आपल्या पावन वाणीतून स्वाध्यायप्रेमी परम पूज्य जिनप्रीतिजी महाराज यांच्याप्रती श्रद्धासुमन अर्पण करताना सांगितले की, ”अशा महान विभूती या जगात अतिशय दुर्मिळ असतात. पूज्य जिनप्रीतिजी महाराज यांनी आपल्या संपूर्ण हयातीत समाजाला धार्मिक संस्कारांनी सिंचित करण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. त्यांनी असंख्य आत्म्यांना धार्मिक शिक्षण व सम्यक ज्ञान देऊन अध्यात्माच्या उंचीवर पोहोचवले आहे.” आमचे नमन, आमचे वंदन
धार्मिक संस्कारांची सरिता वाहणारे, अनेक जीवांचे आध्यात्मिक कल्याण करणारे आणि जन-जनांच्या आयुष्याला सन्मार्ग दाखवणारे परम पूज्य जिनप्रीतिजी महाराज यांच्या पावन चरणी त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त वंदन करण्यात आले.
सुराणा परिवाराच्या मालेगाव कैम्प यांच्या सांसारिक मातोश्री पूज्य जिनप्रीति जी महाराज यांनी दिलेले संस्कार आणि ज्ञानाचा प्रकाश सदैव आपल्या आयुष्याला मार्गदर्शन करत राहो, अशी भावना यावेळी कीर्ती सुराणा यांनी व्यक्त केली.

