
लोहोणेर येथील जनता विद्यालयात आयोजित पालक मेळाव्यात मार्गदर्शन करताना मविप्र संचालक विजय पगार समवेत शालेय समिती,शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के आणि पर्यवेक्षक विलास निकम.(छाया-:सुनिल एखंडे)
लोहोणेर-:(प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात पालक मेळावा संपन्न झाला. पालक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार होते तर माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर,दिगंबर कोठावदे,पंडित पाठक,दिपक देशमुख,वसंत शेवाळे, योगेश पवार,कमलाकर नेरकर,प्रभाकर झाल्टे,किशोर जाधव आदींसह मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के व पर्यवेक्षक विलास निकम व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.गितमंचाने ईशस्तवन व स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकातून मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी पालक मेळाव्याचा हेतू सांगितला. त्यानंतर शिक्षक पालक संघ,माता पालक आणि विशाखा समितीची निवड करण्यात आली. प्रविण आहिरे, यशवंत शेवाळे,दत्तात्रेय बागुल आदी पालकांनी प्रश्न उपस्थित केले. पालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी उत्तरे देत पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत ज्या अपेक्षा शाळेकडून व्यक्त केल्या त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.त्यांनतर शालेय समिती सदस्य पंडित पाठक व दिगंबर कोठावदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत पालकांनी एक जबाबदार पालक म्हणून आपल्या पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच वेळोवेळी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगती व गुणवत्तेच्या संदर्भात शाळा व शिक्षकांशी संवाद साधला पाहिजे असे मत व्यक्त केले. शेवटी मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार यांनी अध्यक्षीय मनोगतातून मार्गदर्शन करताना मविप्र संस्था ही नेहमी विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून काम करत असते व सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना चांगल्या पद्धतीच शिक्षण मिळावे म्हणून सतत प्रयत्नशील असते म्हणून पालकांनी जेव्हा पालक मेळावा आयोजित केला जातो तेव्हा पालक मेळाव्याला हजर राहून आपल्या पाल्याच्या बाबतीत असलेल्या अडचणी नि:संकोचपणे मांडल्या पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीत अडथळे येणार नाही असे सांगितले.यावेळी पालक उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राकेश थोरात यांनी केले.यावेळी इयत्ता ५वी ते १०वी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे, छोटू वाघ,दशरथ आहेर, ज्योती पाटील,मनिषा गिरासे,हर्षला निकम आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंदानी सहकार्य केले.

