
नांदगाव नगर परिषदेच्या सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार विभागातील कारभाराबाबत आणि तेथे कार्यरत महिलांच्या कामकाजाबाबत दिलेल्या तक्रारींची प्रशासनाकडून चौकशी न झाल्याच्या निषेधार्थ आगामी सोमवार, ३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजता नांदगाव ते नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य ‘पायी लाँग मार्च’ काढण्याचा इशारा महिला प्रतिनिधी व नागरिकांनी दिला आहे.
शालेय पोषण आहार ही विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी निगडित अत्यंत संवेदनशील आणि पारदर्शकपणे राबवण्याची योजना आहे. सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील पोषण आहाराबाबत प्राप्त तक्रारींची सत्यपरिस्थिती समोर यावी, यासाठी सौ. संगीता सोनवणे व सहकारी महिलांनी दिनांक १० जुलै २०२६ रोजी विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच गट विकास अधिकारी व तालुकाधिकारी (शालेय पोषण आहार विभाग, पंचायत समिती नांदगाव) यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला होता. या अर्जाद्वारे खालील प्रमुख बाबींची व प्रमाणित सत्यप्रतींची (Attested Copies) मागणी करण्यात आली होती:

संबंधित शिजवणाऱ्या महिलांविरोधात आजतागायत प्राप्त झालेल्या सर्व लेखी तक्रारींची संख्या व त्यांच्या प्रमाणित सत्यप्रती.
प्राप्त तक्रारींवर शाळा प्रशासन अथवा पंचायत समिती प्रशासनाने केलेली प्रशासकीय/कायदेशीर कारवाई व अधिकृत आदेश.
कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्यास तसे अधिकृत लेखी स्पष्टीकरण.
मात्र, अर्ज सादर करून पुरेसा कालावधी उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही चौकशी करण्यात आली नाही किंवा मागितलेली कागदपत्रे उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. प्रशासनाच्या या उदासीन व टंगळमंगळ धोरणामुळे स्थानिक नागरिक व महिलांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.
मुख्य मागण्या:
उच्चस्तरीय चौकशी: सावित्रीबाई फुले कन्या विद्यालयातील शालेय पोषण आहार योजनेतील चौकशी व कामकाजाची नाशिक जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओंकार पवार साहेब यांच्या स्तरावरून उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी.
माहिती व कागदपत्रे प्रदान: १० जुलै २०२६ रोजी अर्जाद्वारे मागितलेली सर्व माहिती व प्रमाणित प्रती तात्काळ लेखी स्वरूपात देण्यात याव्यात.
प्रशासकीय दिरंगाईचा निषेध नोंदवत ३ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजता नांदगाव येथून नाशिक जिल्हाधिकारी कार्यलयावर महिला व नागरिकांचा पायी लाँग मार्च निघणार आहे. या लाँग मार्चदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास किंवा कोणाच्या आरोग्यास अथवा जिवास धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासन व पोषण आहार विभागाची राहील, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी मा. ओंकार पवार साहेब, पोलीस निरीक्षक (नांदगाव), गट विकास अधिकारी व तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदक व आंदोलन समन्वयक:
- सौ. संगीता सोनवणे
- सौ. आशाबाई काकळीज
- सर्व महिला व नागरिक तसेच आधारवड महिला बहुउउद्देशीय सेवाभावी संस्था पदाधिकारी व सदस्य

