
साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज मालेगाव न्यायालयासमोर त्यांच्या नियोजित स्मारकाच्या जागेवर आयोजित जयंती उत्सवात शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे सहभागी झाले.
यावेळी ना. भुसे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या साहित्यिक, सामाजिक आणि परिवर्तनवादी कार्याचे स्मरण केले.

आपल्या लेखणी, लोककला आणि शाहिरीच्या माध्यमातून आण्णाभाऊ साठे यांनी कष्टकरी, वंचित आणि उपेक्षित समाजाच्या वेदनांना प्रभावीपणे वाचा फोडली. सामाजिक समता, न्याय आणि मानवी स्वाभिमानाचा संदेश त्यांनी जनमानसात रुजवला. त्यांचे विचार आणि संघर्षमय जीवन आजही समाजाला अन्यायाविरोधात लढण्याची प्रेरणा देत आहेत.

मालेगाव येथे उभारण्यात येणारे त्यांचे नियोजित स्मारक हे भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल आणि त्यांच्या महान कार्याची स्मृती चिरंतन जपेल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.

