
नांदगाव (प्रतिनिधी ) कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदगाव येथे महाविद्यालयाच्या ‘राष्ट्रीय सेवा योजना’ विभागाच्या वतीने 1 ऑगस्ट 2026 रोजी ‘लोकमान्य टिळक जयंती’ व ‘लोकशाहीर आण्णाभाऊ साठे’ यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी ‘लोकमान्य टिळक’ व ‘आण्णाभाऊ साठे’ यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी दोन्ही महापुरुषांना विनम्र अभिवादन केले.

महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्मदिन ‘लेखन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एन.यु.पाटील यांनी याप्रसंगी ‘लोकमान्य टिळक’ व साहित्यरत्न ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. या महापुरुषांच्या जीवन चरित्रातून प्रेरणा घेण्याचे आवाहन याप्रसंगी विद्यार्थ्यांना केले .

कार्यक्रमाचे वक्ते डॉ. झनकर यांनी याप्रसंगी ‘अण्णाभाऊ साठे’ यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली तसेच अण्णाभाऊ साठेंना प्रतिकूल आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे अल्प शालेय शिक्षण घ्यावे लागले परंतु शिक्षणामुळे समाजात सकारात्मक बदल घडवून आणता येऊ शकतो यावर त्यांची नितांत श्रद्धा होती म्हणूनच अल्पशिक्षित असूनही त्यांनी मोठी ग्रंथ संपदा लिहिली. तत्कालीन समाजात जनजागृती केली. वाचन व लिखाणाने व्यक्ती बहुश्रुत होत असल्याने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच समाजात वावरताना समाजमनाचे व समाजातील विविध घडामोडींचे सूक्ष्म निरीक्षण करून लिखाण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी मंचावर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए. मराठे,डॉ.सी.बी.निगळे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.योगेश वाघ यांनी केले तर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.एस.ए.मराठे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

