
लासलगाव (प्रतिनिधी ):
उच्च व तंत्रशिक्षण विभाग (महाराष्ट्र शासन) आणि सावित्रीबाई फुले पुणे, विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ९ जुलै ते २५ जुलै २०२६ दरम्यान आयोजित ‘सक्षम महिला व समृद्ध साहित्य दिंडी’मध्ये नूतन विद्या प्रसारक मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, लासलगाव येथील राष्ट्रीय सेवा योजनेचे (NSS) स्वयंसेवक व संघनायक यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.

“स्वच्छ वारी, निर्मल वारी, हरित वारी आणि साहित्य वारी” हा मूलमंत्र प्रत्यक्ष कृतीतून प्रत्येक वारकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून एकूण १५० विद्यार्थी-प्रतिनिधी सहभागी झाले होते.
या वारी दरम्यान स्वयंसेवकांनी सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर आधारित पथनाट्ये सादर केली. त्यासोबतच सामाजिक व सांस्कृतिक सलोखा, व्यसनमुक्ती व तणावमुक्ती मार्गदर्शन,पर्यावरण संवर्धन आणि आरोग्यविषयक प्रबोधन,वारकऱ्यांच्या मुलाखती व सेवा-शुश्रूषा, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार, वृक्षारोपण, प्लास्टिक निर्मूलन आणि पालखी तळ स्वच्छता इत्यादी उपक्रम दररोज यशस्वीरीत्या राबवून वारकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
या उपक्रमात लासलगाव महाविद्यालयातून आदित्य म्हसकर आणि कार्तिक कदम या स्वयंसेवकांनी, तर डॉ. संजय शिंदे यांनी संघनायक म्हणून प्रतिनिधीत्व केले आणि संपूर्ण वारी दरम्यान उत्कृष्ट कामगिरी बजावली. विद्यार्थ्यांच्या या सामाजिक उपक्रमातील सहभागाबद्दल संस्थेचे सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांनी विशेष कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

