
लासलगाव (प्रतिनिधी): येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) च्या नियमित उपक्रमांचा उद्घाटन सोहळा महाविद्यालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. समाजसेवेचे व्रत अंगीकारून युवक राष्ट्र उभारणीच्या कामात मोलाचे योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सोमनाथ आरोटे यांनी केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. आरोटे यांच्या हस्ते झाले, तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे होते. मंचावर उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा. उज्ज्वल शेलार, प्रा. किशोर गोसावी व श्रीमती दीपाली कुलकर्णी उपस्थित होते.
प्रारंभी विद्येची देवता सरस्वती माता, तरुणाईचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद, स्वच्छतेचे दूत संत गाडगेबाबा व क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंती निमित्त प्रतिमांचे पूजन करून आणि दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. कु. स्वरदा कटारे आणि ग्रुपने स्वागतगीत सादर केले. रा.से.यो. अधिकारी प्रा. सुनिल गायकर यांनी प्रास्ताविकात वर्षभरात राबवल्या जाणाऱ्या नियमित व श्रमसंस्कार शिबीरांचा आढावा घेतला.
पर्यवेक्षक प्रा.उज्ज्वल शेलार यांनी रा.से.यो. तून देशसेवेचे संस्कार मिळतात असे सांगितले, तर प्रा.किशोर गोसावी यांनी स्वयंसेवकांनी रासेयोच्या माध्यमातून उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून घडावे असे आवाहन केले. अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोरे यांनी स्वयंसेवकांच्या कामाची प्रशंसा करत पाठीवर कौतुकाची थाप देऊन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणिता आहेर व अनुष्का सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रा. देवेंद्र भांडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. प्राचार्य डॉ. आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. देवेंद्र भांडे, प्रा. सुनिल गायकर व स्वयंसेवकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री. गोविंदराव होळकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

