श्यामसुंदर झळके/ सिन्नर प्रतिनिधी

रिमझिम पावसात गोंदेश्वर मंदिराची वारसा संवर्धन फेरी (हेरीटेज वॉक)उत्साहात
सुमारे ७० इतिहासप्रेमींचा सहभाग; गोंदेश्वर मंदिराच्या इतिहास, स्थापत्य व शिल्पवैभवाची प्रत्यक्ष ओळख

सहकार महर्षी थोरात महाविद्यालय, जिजामाता हायस्कूल, संगमनेर तसेच कै. शंकरराव शेवाळे प्रतिष्ठान, संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली ‘वारसा संवर्धन फेरी (Heritage Walk)’ सिन्नर येथील ऐतिहासिक गोंदेश्वर मंदिर परिसरात रिमझिम पावसाच्या रम्य वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या वारसा संवर्धन फेरीत सुमारे ७० इतिहासप्रेमी, प्राध्यापक, विद्यार्थी, संशोधक, प्रतिष्ठित नागरिक तसेच सिन्नर व संगमनेर परिसरातील वारसाप्रेमींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी गोंदेश्वर मंदिराचे लेखक सुप्रसिद्ध समाजप्रबोधनकार तसेच इतिहास अभ्यासक ,वक्ते,शिव व्याख्याते,कवी प्रा.जावेद शेख यांच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करून दिला.
सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिराचा ऐतिहासिक वारसा पर्यटकांना समजावून सांगताना प्रा. जावेद शेख सर


कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन डॉ. विठ्ठल शेवाळे, प्रा. डॉ. बाळासाहेब वाघ आणि रमेश थोरात यांनी केले.
वारसा फेरीच्या प्रारंभी सिन्नरचे ज्येष्ठ इतिहासकार प्राचार्य पंडितराव देशमुख यांनी राष्ट्रकूट ते यादवकालीन इतिहासाचा आढावा घेत गोंदेश्वर मंदिराच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची अभ्यासपूर्ण माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना मध्ययुगीन महाराष्ट्राचा इतिहास आणि सिन्नरचे ऐतिहासिक महत्त्व समजून घेण्याची संधी मिळाली.
इतिहास अभ्यासक प्रा. जावेद शेख यांनी प्रत्यक्ष मंदिर परिसरात फिरवत गोंदेश्वर मंदिराचा इतिहास, भूमिज स्थापत्यशैली, मंदिराची रचना, विविध देव-देवतांची शिल्पसंपदा, रामायण व महाभारतातील प्रसंग दर्शविणाऱ्या शिल्पमालिका, स्थापत्यातील कलात्मक वैशिष्ट्ये तसेच शिल्पकारांच्या अद्वितीय कलाकौशल्याची सविस्तर माहिती दिली. उपस्थितांनी प्रत्येक शिल्पाकृती प्रत्यक्ष पाहत त्यामागील इतिहास, धार्मिक आशय आणि कलात्मक वैशिष्ट्ये जाणून घेतली.
या प्रसंगी डॉ. श्यामसुंदर झळके, मंदिर स्थापत्य अभ्यासक महेश शिरसाठ,लेखक गोविंद मोरे तसेच सुनील कुऱ्हे सर यांनीही वारसा फेरीत सहभागी होत कार्यक्रमाचे संकलन व समन्वयाची जबाबदारी पार पाडली.
रिमझिम पावसातही सहभागींचा उत्साह अविरत राहिला. ऐतिहासिक वारसा केवळ पाहण्यापुरता मर्यादित न ठेवता त्याचे जतन, संवर्धन आणि पुढील पिढ्यांपर्यंत त्याची माहिती पोहोचविण्याचा संकल्प सर्व उपस्थितांनी व्यक्त केला. इतिहास, स्थापत्य आणि सांस्कृतिक वारशाबद्दल जनजागृती करणारा हा उपक्रम सहभागींसाठी संस्मरणीय ठरला.
वारसा संवर्धनासाठी अशा प्रकारच्या अभ्यासपूर्ण फेऱ्यांचे आयोजन सातत्याने व्हावे, अशी अपेक्षा उपस्थित इतिहासप्रेमींनी व्यक्त केली.

